भाजपच्या नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे या वाढत्या महागाई विरोधात निषेध करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याची घटना घडली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन करण्यात आले. या मूक आंदोलनात वैशाली नागवडे देखील सहभागी झाल्या होत्या.तर यावेळी कोणताही अनुचित घटना घडू नये,त्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी वैशाली नागवडे म्हणाल्या “आम्ही स्मृती इराणी यांना बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात निवेदन देण्यासाठी गेलो होतो. सध्या जी महागाई होत आहे.त्याबाबत त्यांना आठवण करून देण्यासाठी गेलो होतो.पण आम्हाला पोलिस बाहेर घेऊन येत असताना, माझ्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला.त्या घटनेचा मी निषेध व्यक्त करीत आहे.या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक करावी”. या हल्ल्यामधून भाजपची मानसिकता दिसत आहे, आमच्यावर किती ही हल्ले झाले तरी आम्ही शांत बसणार नसून महागाई विरोधात सतत आवाज उठविणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.