पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल, हे सांगता येणार नाही. माझ्या पक्षाच्या उमेदवाराबाबत मी सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळेच आगामी लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढवितील. मात्र,;महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र येऊन कोण कोठून निवडणूक लढविणार हे ठरवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे सांगितले.शहरातील काही मानाच्या तसेच प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना जयंत पाटील यांनी रविवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत भाष्य केले. शरद पवार आणि अजित पवार गटात गेलेले प्रफुल्ल पटेल यांच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या छायाचित्राबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
संसदेचे अधिवेशन असताना अनेक खासदार एकत्र भेटतात. छायाचित्र काढतात. पटेल यांनीही काढले असेल. उद्योगपती अदानी यांनी नवी उद्योग सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनाला पवार गेले, यात गैर काही नाही. अदानी यांना नवा प्रकल्प पवार यांना दाखवायचा असेल. भाजप विरोधातील इंडिया आघाडीत पवार महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणी शंका घेण्याची गरज नाही, असे पाटील यांनी सांगितले.लोकशाहीत कोणी कोणाचा फलक लावू शकतो. समर्थक कोणाला कुठेही बसवितात. पक्षाकडे अनेक असे नेते आहेत जे मुख्यमंत्री होण्याच्या ताकदीचे आहेत. त्यांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लागतात, अशी प्रतिक्रियाही जयंत पाटील यांनी युवा नेते, आमदार रोहित पवार यांच्यासंदर्भात लावण्यात आलेल्या फलकांबाबत दिली.
हेही वाचा >>>VIDEO: गोष्ट पुण्याची-९९ : मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या किर्तनांचं साक्षीदार असलेलं प्राचीन ‘नागेश्वर मंदिर’
ते म्हणाले की, दुष्काळाबाबतची सरकारची घोषणा हवेतच राहिली आहे. सरकारकडून कोणतीही बैठक झालेली नाही. सरकार भूमिका घेत नाही. ते निवडणुकीत गुंतले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना गणेश मंडळांना भेट देण्यासाठी वेळ आहे, मात्र बैठक घेण्यासाठी नाही.