कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता असलेला पुणे जिल्हा महायुतीच्या ताब्यात आला असून, चारपैकी तीन जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड विजयी झाले आहेत. इतकेच नव्हे, तर खुद्द पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात काही लाखांच्या फरकाने निवडून येणाऱ्या सुप्रिया सुळे यांना विजयासाठी प्रचंड झगडावे लागले. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांवरून संपूर्ण जिल्ह्य़ात नरेंद्र मोदी यांची मोठी लाट आणि त्याचवेळी आघाडीबद्दल नाराजी असल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओखळल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात भाजपचे अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे डॉ. विश्वजित कदम यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. त्यांनी तब्बल ३ लाख १५ हजारांचे मताधिक्य घेत पुण्यासाठी नवा विक्रम प्रस्थापित केला. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी कसाबसा विजय मिळवला. त्या पहिल्या पाच फेऱ्यांपर्यंत पिछाडीवर होत्या. त्यांनी केवळ ६९४३ मतांनी विजय मिळवला. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीतून बाहेर पडून शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे आमदार लक्ष्मण जगताप यांचा शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा पराभव केला. त्यांनी तब्बल एक लाख ५७ हजारांहून अधिक मताधिक्य घेतले. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यांची अनामत रक्कम जप्त झाली. शिरूर मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांनी हॅट्ट्रिक केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांचा तीन लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. पुणे, शिरूर या मतदारसंघांमध्ये उभ्या असलेल्या मनसेच्या उमेदवारांनाही आपली अनामत रक्कम टिकवता आली नाही.
पवारांचा पुणे जिल्हा महायुतीच्या ताब्यात!
खुद्द पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात काही लाखांच्या फरकाने निवडून येणाऱ्या सुप्रिया सुळे यांना विजयासाठी प्रचंड झगडावे लागले.
First published on: 17-05-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp supriya sule election result