भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेच्या आवारात हल्ला झाल्यानंतर राजकारण चागलंच तापलं होतं. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली घेत कारवाईची मागणी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तसंच शिवसेनेच्या शहर प्रमुखांसह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी अजून आक्रमक भूमिका घेतली असून पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी झाडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रसेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरुन टीका केली असून टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळेंनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. धक्काबुक्कीनंतर किरीट सोमय्यांकडून होणाऱ्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालेलं नाही. आरोप जरुर करावेत, पण या देशात यंत्रणा आहे. तुम्ही सरकारकडे, कोर्टात जा, पण इतक्या वेळा पत्रकार परिषद घेऊन रोज नव्याने आरोप करण्याचा हा ट्रेंड आला आहे. टीव्ही मालिकेच्या जाहिरातीप्रमाणे ते सुरु आहे. हे दुर्देवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही”.
केंद्रावर टीका
मुंबईत ईडीकडून धाडी सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापकर करत दबाव आणला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “मी संसदेतही या विषयावर बोलले आहे. केंद्र सरकार सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षातच या नोटीस कशा येतात याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. विरोधात असताना येणाऱ्या नोटीशी भाजपात गेलात की कुठे जातात ते देवाला माहित. ही दडपशाही असून सातत्याने लोकांना केंद्र सरकार घाबरवत आहे”.
“किरीट सोमय्यांचे हात पाय तोडा; दोन-चार महिने उठले नाही पाहिजेत असा आदेश होता”
गुजरातमधील बँक घोटाळ्यासंबंधी बोलताना त्यांनी म्हटलं की, “या देशात कोणत्याही राज्यात झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी केंद्राने घेतली पाहिजे. सात वर्षांपासून यांचंच सरकार देशात असताना मग काय करत होते? याची व्यापक चर्चा संसदेत करणार आहोत”.
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य
“मलाही विषय माहिती नाही. दुपारी पत्रकार परिषद होणार असून फक्त राज्य नाही तर देश या पत्रकार परिषदकडे अपेक्षेने बघत आहे. संजय राऊत काय म्हणतात हे पहावं लागणार आहे. पण जेव्हा साधारण ते असा इशारा देतात तेव्हा ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचंच असेल यावर माझा विश्वास आहे,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.