विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून माजी नगरसेवक श्रीकांत पाटील आणि सुनील बनकर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
निवडणूक तयारीच्या दृष्टीने दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा प्रस्ताव शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी मांडला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संमती मिळाल्यामुळे दोन कार्याध्यक्ष नियुक्त होणार हे गेल्या आठवडय़ातच निश्चित झाले होते. त्यानुसार पाटील आणि बनकर यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. श्रीकांत पाटील यांच्याकडे शिवाजीनगर, कोथरूड, कसबा आणि वडगाव शेरी या चार विधानसभा मतदारसंघांची आणि बनकर यांच्याकडे हडपसर, पर्वती, कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत सन २००७ ते १२ या कालावधीत या दोघांनीही नगरसेवक म्हणून काम केले असून पाटील यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
शहराच्या प्रश्नांबाबत तसेच विविध कामे मार्गी लावण्याबाबत राष्ट्रवादीने नियोजन केले असून प्रामुख्याने बीआरटी, स्वच्छता आदी कामांवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचेही वंदना चव्हाण यांनी यावेळी सांगितले. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग तयार असूनही त्याचा वापर अद्याप सुरू झालेला नाही. तेथील बसथांब्यांची दुरवस्था सुरू झाली आहे. त्यामुळे तो मार्ग लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी पक्ष प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp vandana chavan election