वंदना चव्हाण शहराध्यक्ष, राष्ट्रवादी
* काँग्रेसबरोबरच्या आघाडीचा पाच वर्षांतील अनुभव काय?
निवडणुकीनंतर समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समवेत आघाडी झाली. मात्र त्यांनी काही मुद्दय़ांवर राजकारण केले, असेच पाच वर्षांतील त्यांच्या कामगिरीचे वर्णन करता येईल. मात्र या गोष्टी आता गौण ठरणार आहेत. विकासाच्या काही मुद्दय़ांबाबत भाजपही आमच्या सोबत होता. तरी महापालिकेत आमची भाजप बरोबर आघाडी होती असेही म्हणता येणार नाही. फक्त विकासाच्या काही मुद्यांवर आम्ही एकत्र होतो.
* नव्याने काँग्रेसबरोबर आघाडी करणार का?
आघाडीबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. आमचे महापालिकेतील संख्याबळ ५६ आहे. त्यांचे २४ आहे. आमची दुप्पट संख्या असेल तर मग आम्हालाही तसे पाहिले तर आघाडीची काय आवश्यकता? मात्र समविचारी पक्षांनी एकत्र यावे, अशी आमची भूमिका आहे. स्वबळावरच लढावे, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना जसे वाटते, तसेच आमच्याही काही कायकर्त्यांमध्ये-पदाधिकाऱ्यांमध्येही आघाडी करावी की नाही, याबाबत मतभिन्नता आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष थेट आघाडीबाबत बोलत असले, तरी आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार असल्यामुळे त्याबाबत उलट-सुलट विधाने करणे योग्य नाही.
* पक्षांतराचा फटका बसणार का?
चव्हाण- भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत. त्यामुळेच ते गळ टाकून बसले आहेत. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपमध्ये का प्रवेश दिला जात आहे हे सर्वाना माहिती आहे. खरे तर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी त्याबाबत उठाव केला पाहिजे. आमच्याकडे सर्वच प्रभागात उमेदवार आहेत. काँग्रेस, मनसे, शिवसेना असे काही संबंधित १० ते १२ कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. दुखावले गेलेले भाजप निष्ठावंतही राष्ट्रवादीकडे धाव घेण्याच्या विचारात आहेत. मात्र त्यांना आम्ही उमेदवारी देऊच, असे आश्वासन देण्यात आलेले नाही.
* पक्षातील अंतर्गत गटबाजी संपुष्टात आली आहे का?
चव्हाण- सर्वच पक्षात मतभेद असतात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अन्य पक्षांच्या तुलनेत समोर आले. मतभेद असले तरी ते काही ठरावीक मुद्दय़ांवरून होते. घर किंवा कुटुंबाप्रमाणेच पक्ष म्हटले की या साऱ्या गोष्टी ओघाने येतातच. पण शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व एकत्रच आहोत. आमचे मतभेद हे अन्य पक्षांप्रमाणे कधीच टोकाचे नव्हते आणि राहणारही नाहीत.
* निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा कोणता असेल?
चव्हाण- शहर विकासाचा मुद्दाच राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रमुख भाग असेल. शहरात भाजपचे आठ आमदार आणि एक खासदार आहेत. त्यांना शहरासाठी अडीच वर्षांत काहीही करता आले नाही, हीच बाब नागरिकांपुढे मांडण्यात येईल. राष्ट्रवादीने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील.
* निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे?
चव्हाण- महापालिकेतील सत्तेत असल्यापासून आमची पक्षसंघटना सक्रिय आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आणि जाहीरनामा करताना लोकसहभाग ही बाब केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. पाच वर्षांत केलेली कामे आणि नागरिकांच्या प्रश्नांचा प्राधान्यक्रमही ठरविण्यात आला आहे. त्याबाबत नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
* पाच वर्षांत कोणती कामे झाली?
चव्हाण- नागरिक केंद्रिबदू मानून सर्वच स्तरांसाठी आम्ही कामे केली. शहर स्वच्छता, वाहतुकीच्या दृष्टीने मेट्रोचा पाठपुरावा, पीएमपी सक्षमीकरण यासाठी प्रयत्न झाले, याचे समाधान आहे. ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. त्यामुळे सुधारणेसाठी वाव आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाने शहराची झालेली निवड, शहर स्वच्छतेबाबत जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर होत असलेला गौरव ही आमच्या कामाची पावती आहे. त्याशिवाय समान पाणीपुरवठा, जायका प्रकल्पासाठी देण्यात आलेली चालना, नागरिकांचे राहणीमान उंचविण्यासाठी झालेले प्रयत्न पक्ष म्हणून समाधान देणारे आहेत.