बेताल वक्तव्य करणारे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्याच्या मावळमध्ये चप्पल – जोडे मारत आंदोलन केले. शिंदे- फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे अवघ्या महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून सत्तारांच्या विरोधात आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्याच्या वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सत्तारांच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला चप्पल आणि जोडे मारून महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
अब्दुल सत्तार हाय हाय, ५० खोके एकदम ओके अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. महिला कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मंत्री पदाचा राजीनामा मागत सत्तारांनी राजीनामा न दिल्यास पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग अडवण्याचा इशारा वडगावच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस ने दिला आहे. ह्या निषेध मोर्चात महिलांची लक्षणीय संख्या होती.