प्रभाग ४० मधील पोटनिवडणुकीत झालेला दयनीय पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याविषयीची नाराजी त्यातून उफाळून आली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीनेही जोर धरला असून पक्षाचे नगरसेवक बाळासाहेब बोडके आणि बंडू केमसे यांनी तसे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बुधवारी दिले. अनेक नगरसेवकांनी या मागणीला तोंडी पाठिंबा दर्शवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रभाग ४० मधील पोटनिवडणुकीत निलिमा लालबिगे यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला, तर राष्ट्रवादीला अवघी ७६७ मते मिळाली आणि अनामत रक्कमही जप्त झाली. या पराभवानंतर राष्ट्रवादीमध्ये शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू झाली आहे. त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीची दोन दिवस चर्चा होती. मात्र, बुधवारी बोडके, केमसे आणि माजी संघटक सचिव शैलेश बडदे यांनी तसे लेखी पत्र अजित पवार यांना दिल्यामुळे चव्हाण यांच्या विरोधात उघड चर्चा सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीत पक्षाकडे सक्षम उमेदवार असतानाही काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाची दिशाभूल केली आणि इतरांना विश्वासात न घेता चव्हाण यांनी उमेदवाराची निवड केली, अशी तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे.
चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबाबत पक्षात खूप नाराजी व अस्वस्थता असली, तरी जाहीरपणे बोलायला कोणी तयार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेकांची भावना आम्ही व्यक्त करत आहोत. ज्यांच्यामागे दहा देखील कार्यकर्ते नाहीत, अशांना चव्हाण यांनी पक्षसंघटनेत महत्त्वाची पदे दिली आहेत. कोणालाही विश्वासात न घेता त्यांचा मनमानी कारभार सुरू असून त्याचा फटका आगामी निवडणुकांमध्येही पक्षाला बसू शकतो. त्यासाठी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे बोडके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहराध्यक्ष चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचा निषेध म्हणून खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे केमसे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा