पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लक्ष्य केले आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. शहराशी संलग्न भागातील हे कार्यकर्ते असून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेला आगामी महापालिका निवडणुकीत फायदा होईल, असा दावा मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत पक्ष प्रवेश झाला. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्या पुढाकारातून पक्षप्रवेश करण्यात आले.

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

आगामी लोकसभेची निवडणूक अडीच वर्षानंतर होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मावळ, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला मात्र शहरी भागाशी संलग्न असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार खडकवासला, वारजे, नऱ्हे-आंबेगाव भागातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

हेही वाचा : खळबळजनक : पुण्यात खासगी सोसायटीच्या सेप्टिक चेंबरची स्वच्छता करताना दोघांचा मृत्यू, एक बेपत्ता

छावा संघटनेचे आप्पा आखाडे, नऱ्हे-आंबेगाव परिसरातील समीर कुटे, भोर तालुक्यातील केळवडे गावातील रोहित वाल्हेकर, वारजे परिसरातील संदीप तांगुदे यांनी मनसेत प्रवेश केला. हे सर्व कार्यकर्ते ताकदीचे असून त्याचा बारामती लोकसभा निवडणुकीबरोबरच आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला निश्चित फायदा होईल, असा दावा वसंत मोरे यांनी केला. दरम्यान, मनसे सरचिटणीस हेमंत संभूस यांची महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेच्या राज्य अध्यक्षपदी आणि संतोस दासवडकर यांची भोर-वेल्हा-मुळशी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.