पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रदीप विद्याधर कंद यांची तर, उपाध्यक्षपदी शुक्राचार्य वांजळे यांची रविवारी बिनविरोध निवड झाली. यापूर्वी उपाध्यक्षपदाचा कार्यभार अडीच वर्षे सांभाळणाऱ्या कंद यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असली तरी कालावधी मात्र, सव्वा वर्षांचाच मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यामध्ये झालेल्या झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी अध्यक्षपदासाठी प्रदीप कंद आणि उपाध्यक्षपदासाठी शुक्राचार्य वांजळे यांच्या नावाची घोषणा केली. मावळते अध्यक्ष दत्ता भरणे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य या वेळी उपस्थित होते.
कंद यांच्या विरोधात अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या स्वाती टकले आणि काँग्रेसच्या सुरेखा मुंढे यांनी तर, वांजळे यांच्या विरोधात उपाध्यक्षपदासाठी भाजपचे गुलाब वरघडे, काँग्रेसच्या ऋतुजा पाटील आणि मनीषा काकडे यांनी अर्ज दाखल केले होते. तीन वाजता सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाल्यावर सौरभ राव यांनी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत दिली. ही निवडणूक बिनविरोध निवड व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आवाहन केल्यानुसार अर्ज मागे घेण्यात आले. सौरभ राव यांनी अध्यक्षपदी कंद आणि उपाध्यक्षपदी वांजळे यांच्या निवडीची घोषणा केली.
सुरक्षारक्षक ते उपाध्यक्ष
जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष प्रदीप कंद हे पेरणे-वाडेबोल्हाई गटातून तर, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे हे कोंढवे-धावडे गटातून निवडून आले आहेत. गोल्डमॅन म्हणून परिचित असलेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे शुक्राचार्य हे बंधू आहेत. यापूर्वी पुणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या शुक्राचार्य वांजळे यांचा सुरक्षारक्षक ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष असा प्रवास झाला आहे. नव्या कार्यकर्त्यांना पदे देता यावीत यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयानुसार उपाध्यक्षपदी अडीच वर्षे काम केलेल्या कंद यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सव्वा वर्षांसाठीच असणार आहेत.

Story img Loader