मागील तीन महिन्यामध्ये वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबससह तब्बल २२ प्रकल्प हे महाराष्ट्रामधून गुजरातसह इतर राज्यात गेल्याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मामलेदार कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा बाजी देखील यावेळी करण्यात आली.
हेही वाचा… बारामतीत विषारी ताडीमुळे दोघांचा मृत्यू; पोलिसांकडून ताडी विक्री करणाऱ्या गुत्यांवर कारवाई सुरू
“राज्यात ईडी सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी झाला. त्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी अनेक वेळा झाली. त्यामधून राज्याला काही तरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या दिल्लीवारी मधून काहीच मिळाले नाही. पण वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्क, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प महाराष्ट्रामधून गुजरात सह इतर राज्यात गेले आहेत. या दौर्या दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना थोडीशी तरी कल्पना असणार, किमान त्यावेळी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारायाला पाहिजे होते. आमच्या राज्यातील प्रकल्प का काढून घेत आहात, हे धाडस दोघांनी दाखवले नाहीच. मात्र राज्यातील प्रकल्प बाहेर घेऊन जाण्यामध्ये या दोघांचा सहभाग स्पष्ट असल्याच दिसत आहे. त्यामुळे आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करीत असून लवकरात लवकर राज्यातील तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्यावा” अशी टीका प्रशांत जगताप यांनी यावेळी केली.