पिंपरी महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अवघड जागेचे दुखणे झाल्याचे पुन्हा दिसून आले आहे. सातत्याने टीका करत आयुक्तांना लक्ष्य करणाऱ्या राष्ट्रवादीने आता,त्यांच्या बदलीची मागणी आम्ही केलीच नाही, असे घूमजाव केले आहे. आयुक्त बदला, असे आमचे म्हणणे नसून आयुक्तांनी त्यांची कार्यपध्दती बदलावी, असा सोयीस्कर युक्तिवाद केला आहे.
आयुक्तांकडून सुरू असलेली अनधिकृत बांधकामांवरील पाडापाडी कारवाई, संबंधित नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे तसेच नागरी सुविधा बंद करण्याचे आदेश, अधिकाऱ्यांच्या बदल्या यासारख्या कारणांमुळे आयुक्त व सत्ताधाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा संघर्ष सुरू आहे. सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आयुक्तांपुढे काही चालत नाही. एखाद्या जहागिरीप्रमाणे पालिका चालवणाऱ्या काही दुकानदार नेत्यांच्या ‘धंद्या’ वर आयुक्तांमुळे आफत आली आहे. सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व नंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे स्थानिक नेत्यांनी आयुक्तांविषयी तक्रारी केल्या. आयुक्त अशाच पध्दतीने काम करत राहिल्यास राष्ट्रवादीच्या हक्काच्या मतपेढीला धक्का बसेल, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत होतील, अशी भीती व्यक्त केली. मात्र, आयुक्त अजित पवार यांचेही ऐकत नसल्याचे काही प्रकरणांचा संदर्भ देत सांगण्यात येते. अलीकडेच शरद पवार यांनी आयुक्तांना दिल्लीत बोलावून घेत यासंदर्भात गंभीर चर्चा केल्याचे सांगण्यात येते. मात्र, पालिकेच्या कामासाठी तेथे गेल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. यापूर्वी आयुक्तांच्या कार्यपध्दतीवर विरोधक सडकून टीका करत होते. विशेषत: खासदार गजानन बाबर तक्रारी करण्यात आघाडीवर होते. मात्र, अलीकडे, विरोधकांकडून आयुक्तांची पाठराखण केली जाते. तर, सत्ताधाऱ्यांकडून गंभीर आरोप होत असल्याचे दिसून येते. शनिवारी झालेल्या महापालिका सभेत याचा प्रत्यय आला. सत्ताधारी नगरसेवकांनी पाणी, रस्ते, सांडपाणी, आरोग्य आदी विकासकामे ठप्प झाल्याच्या व आयुक्त मनमानी करत असल्याच्या तक्रारी केल्या. अधिकारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठकांमध्येच असतात, काम कमी व बैठकांचा अतिरेक होत आहे, याकडे लक्ष वेधले. आयुक्तांची बदली व्हावी, अशी राष्ट्रवादीची तीव्र इच्छा आहे. मात्र, तसे झाल्यास बूमरँग होणार असल्याचेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही बदलीची मागणी केलीच नाही, असा घूमजाव राष्ट्रवादीने केला आहे.

Story img Loader