पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे मंगळवारी बहुमताने विजयी झाले. त्यांनी भाजप, शिवसेना, मनसे युतीचे हेमंत रासने यांचा दोन मतांनी पराभव केला. महापालिकेत मनसेने युतीला साथ दिल्याचे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच दिसले.
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीतर्फे विशाल तांबे यांनी अर्ज दाखल केला होता, तर भाजप-शिवसेना युतीतर्फे हेमंत रासने आणि मनसेतर्फे किशोर शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. सोळा सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये काँग्रेस आघाडीकडे नऊ, युतीकडे चार आणि मनसेकडे तीन मते आहेत. त्यामुळे तांबे यांचा विजय निश्चित होता; फक्त मनसेचा उमेदवार निवडणुकीत काय करणार याची उत्सुकता होती.
निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या वेळेत मनसेचे शिंदे यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. फेब्रुवारी २०१२ मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीनंतर मनसेने वेळोवेळी स्वतंत्र अस्तित्व दाखवले किंवा काही वेळा मतदानात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. या वेळी प्रथमच मनसे आणि भाजप-शिवसेना यांची युती झाल्याचे मंगळवारी दिसले. अर्ज माघारीनंतर झालेल्या मतदानात तांबे यांना नऊ, तर रासने यांना युतीची चार आणि मनसेची तीन अशी सात मते मिळाली.
मतदानाची प्रक्रिया संपताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत तांबे यांचा विजय साजरा केला. महापौर वैशाली बनकर, उपमहापौर दीपक मानकर, सभागृहनेता सुभाष जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड आदींनी तांबे यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. तर महापालिका भवनाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून राष्ट्रवादीच्या विजयाचा आनंद साजरा केला.
विशाल तांबे या वेळी दुसऱ्यांदा महापालिकेवर निवडून आले आहेत. गेल्यावेळी ते चैतन्यनगर, धनकवडी या १३५ क्रमांकाच्या वॉर्डमधून निवडून आले होते. प्रभाग रचनेनंतर झालेल्या निवडणुकीत ते प्रभाग क्रमांक ७४ ब या जागेवरून निवडून आले. शाहू महाविद्यालयामधून त्यांनी सर्वप्रथम विद्यापीठ प्रतिनिधीची निवडणूक लढवली होती. राजकारणाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे कार्य आहे. ओतूर येथील श्री गजाननमहाराज शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेचेही काम ते पाहतात. विविध शिक्षण संस्थांचे ते पदाधिकारी आहेत.
ई-गव्हर्नन्सला प्राधान्य – तांबे
अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ई-गव्हर्नन्सला तसेच महापालिकेचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. स्थायी समितीची बैठक ज्या सभागृहात चालते तेथून सर्व क्षेत्रीय कार्यालये व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा जोडण्याची योजना राबवणार असून त्यामुळे संबंधित सर्व अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करता येईल, असेही ते म्हणाले.