पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील गेल्या ५१ दिवसांपासून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे आहे कुठे आहे? या आरोपीला पकडण्यात अद्यापही राज्य सरकारला यश का आले नाही? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सरकारच्या कारभारावर टीका केली. जोपर्यंत बीडमधील संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सुळे यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी, खडकवासला आणि इतर भागात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी नांदेड फाटा येथील ज्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. तेथे भेट देत नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या खून प्रकरणावरून खासदार सुळे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

बीड मधील स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, नमिता मुंदडा, प्रकाश सोळंकी यांनी देशमुख खून प्रकरणात गेल्या ५० दिवसांमध्ये अनेक आरोप केले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नोंद घेऊन महाराष्ट्राला न्याय द्यावा, अशी अपेक्षा खासदार सुळे यांनी व्यक्त केली. देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा ५१ दिवसांपासून बेपत्ता आहे. तो नेमका कुठे आहे? तो असा गायब कसा होऊ शकतो? पोलिसांना त्याचा शोध का लागत आहे. पोलिसांची यंत्रणा काय करत आहे? असा सवालही सुळे यांनी विचारला आहे.

बीड प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री म्हणाले की, ही कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यावर काय निर्णय घेतात याकडे आपलेही लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीडमध्ये पीकविमा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात हार्वेस्टर आणि पिक विमा घोटाळा हे दोन मोठे घोटाळे झाले आहेत. राज्याचे विद्यमान कृषी मंत्र्यांनीच घोटाळे झाली असल्याची कबुली आहे. पीकविमा आणि हार्वेस्टर घोटाळा कुठे झाला आहे, याची सर्व माहिती राज्य सरकारकडे आहे. राज्य सरकारने ती त्यांनी समोर आणावी, अशी मागणीही सुळे यांनी केली.

राज्यात हप्तेबाजी, भ्रष्टाचार हे सर्व सुरू आहे, ते थांबले पाहिजे. यासाठी माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहे. संसदेचे जरी अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे मुद्दे महाविकास आघाडीचे सर्व खासदार मोठ्या ताकदीने मांडणार आहोत. भाजपा आणि शिंदे गटाच्या खासदारांची दिल्लीत भेट घेणार असून सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संसदेत बीड, परभणीच्या घटनांविषयी बोलले पाहिजे. या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या घटनेची माहिती देणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncpsp mp supriya sule to meet home minister amit shah for sarpanch santosh deshmukh murder case investigation pune print news ccm 82 css