सुपर डिमोना विमान आणि सी व्हॉक हेलिकॉप्टर्सची सलामी आणि छात्रांच्या शिस्तबद्ध संचलनात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए)१२५ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन समारंभ शनिवारी पार पडला. या वेळी वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊनी यांनी मानवंदना स्वीकारली. छात्रांनी केलेली परेड सवरेत्कृष्ट झाल्याची पावती त्यांनी दिली.
या दीक्षान्त संचलनात २९६ कॅडेटचा सहभाग असून त्यामध्ये सहा परदेशी छात्रांचा समावेश आहे. या वेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंग, एनडीएचे कमाडंट एअर मार्शल के. एस. गिल, उप कमाडन्ट रेअर अॅडमिरल अनंद लेअर उपस्थित होते. या वेळी ब्राऊनी यांनी सांगितले की, एनडीएच्या ३९ व्या तुकडीच्या पदवीदान सोहळ्याचा दिवस आठवत आहे. ४३ वर्षांपूर्वी या ठिकाणीच मी दीक्षान्त संचलन केले होते. या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल खूप आनंद होत आहे. छात्रांनी केलेली परेड सवरेत्कृष्ट होती. छात्रांना उद्देशून बोलताना ते म्हणाले की, देशाचे भविष्य तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही या ठिकाणी खडतर प्रशिक्षण घेतले आहे. तुमच्या स्पिरिटला मी सलाम करतो. सैन्यदलातील मूलभूत मूल्ये आता तुमचे व्यक्तिमत्त्व घडवतील आणि त्यातून तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची क्षमता मिळेल. आगामी काळात देशाच्या संरक्षणासाठी तुम्हाला चोवीस तास काम करायचे आहे. तुमच्यातून देशाला नवीन नेतृत्व मिळणार आहे. त्यासाठी येणाऱ्या आव्हानासाठी सज्ज राहा आणि त्या आव्हानांना आत्मविश्वासाने तोंड द्या. तुमची शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबू देऊ नका. सतत येणारे नवीन तंत्रज्ञान शिकत रहा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
एनडीएच्या १२५ व्या तुकडीमध्ये दीक्षान्त संचलनात मूळचा आग्राचा आणि सहावी पासून साताऱ्यातील सैनिकी शाळेत शिकलेल्या मनोज कुमार याने सुवर्णपदक पटकाविले. तर, उत्तराखंडच्या योगेश धामी हा रौप्य पदकाचा मानकरी ठरला. सातारा जिल्ह्य़ातील वाईच्या संजय इथापे याने कास्य पदक पटकाविले. धामी याने दीक्षान्त संचलनाचे नेतृत्व केले.