देशाच्या सीमांचे रक्षण करणारे जवान आणि लष्करी अधिकारी यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’मध्ये (एनडीए) विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष देण्यात आले आहे. सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करणाऱ्या ‘द्रोणाचार्य’ या वास्तूमध्ये खडतर प्रशिक्षण आणि संस्कार यांच्या मिलाफातून भावी लष्करी अधिकारी घडविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एनडीएच्या १२७ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन आणि पदवी प्रदान समारंभाची पत्रकारांना महिती देण्यात आली. पायदळ, नौदल आणि हवाई दल या लष्कराच्या तीनही दलातील जवानांना घडविण्याचे काम प्रबोधिनीमध्ये केले जात आहे. या प्रशिक्षणामध्ये केवळ लष्करी शिस्त असू नये, तर त्याचबरोबरीने छात्रांवर संस्कार घडवावेत यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल करून ते सातत्याने अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल आर. के. एस. भादुरिया यांनी दिली. एका बाजूला कडक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला संस्कार घडविण्याच्या प्रक्रियेमुळे प्रबोधिनीमध्ये रॅिगगसारखे गैरप्रकार घडत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
‘आर्मी ट्रेनिंग टीम’मध्ये छात्रांच्या सर्वागीण विकासावर भर देण्यात आला आहे. येथील प्रशिक्षणाने पाया पक्का झालेला विद्यार्थी इंडियन मिलिटरी अॅकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होतो. ‘एनडीए’मधील द्रोणाचार्य या वास्तूमध्ये दहा छात्रांना एकत्रित ‘सेक्शन कमांडर’साठीचे शिक्षण दिले जाते. हत्यारांची जुळणी, दुरुस्ती आणि देखभाल, रेडिओ टेलिफोनी या विषयांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. शस्त्रामध्ये गोळी आणि बॉम्ब कसा भरायचा, शस्त्रे नादुरुस्त झाल्यावर त्याची दुरुस्ती कशी करायची याबरोबरच नकाशा वाचन (मॅप रिडिंग) शिक्षणावर भर दिला जात आहे, अशी माहिती आर्मी ट्रेनिंग टीमचे कर्नल राजेश डोग्रा यांनी दिली. कर्नल राजवर्धन राठोड यांनी येथेच प्रशिक्षण घेत ऑलिम्पिकमध्ये पदक संपादन केले. ‘सिम्युलेशन फायिरग’ चे प्रशिक्षण देण्यासाठी मॉडेल रुम साकारण्यात आली असून येथे नौदल आणि हवाई दलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षण दिले जाते, असे डोग्रा यांनी सांगितले.
‘एअर फोर्स ट्रेनिंग टीम’मध्ये छात्रांना ऑस्ट्रियन बनावटीच्या सुपर डिमोना विमानांच्या माध्यमातून हवाई उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी सहा विमाने होती, मात्र गेल्या वर्षी त्यामध्ये पाच विमानांची भर पडल्याने आता ‘एनडीए’च्या ताफ्यामध्ये ११ सुपर डिमोना विमाने आहेत. ही विमाने उड्डाणासाठी सुरक्षित असून प्राथमिक शिक्षणासाठी उत्कृष्ट असल्याची माहिती िवग कमांडर एस. के. सिंग यांनी दिली.
‘नेव्हल ट्रेनिंग टीम’मध्ये अद्ययावत प्रशिक्षणावर भर दिला जात असून सिम्युलेशन बोटींग शिकविले जात आहे. येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन बोटी लवकरच नव्याने दाखल होणार असल्याची माहिती हरिवदर अवतार यांनी दिली.