‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीतांच्या तालावर स्नातकांनी केलेले शिस्तबद्ध संचलन.. गिरक्या घेत सुखोई विमानांनी आकाशात केलेल्या कसरती.. चेतक हेलिकॉप्टर, जग्वार आणि सुपर डिमोना विमानांनी दिलेली सलामी.. अशा शानदार दीक्षांत संचलनाने सर्वाची मने जिंकत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२६ व्या तुकडीच्या खडतर प्रशिक्षणाची शनिवारी सांगता झाली. दीक्षांत संचलनानंतर स्नातकांनी टोप्या हवेत भिरकावून आपला आनंद व्यक्त केला.
हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल
अरुप राहा यांनी या दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, प्रबोधिनीचे प्रमुख कमांडंट एअर मार्शल कुशवंत सिंह गिल, उपप्रमुख मेजर जनरल अशोक आंब्रे या वेळी उपस्थित होते. अरुप राहा यांच्या हस्ते राहुल कदयान याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. विवेक यादव याला रौप्यपदकाने आणि सूर्य प्रकाश याला कांस्यपदकाने गौरविण्यात आले. ‘एन’ (नोव्हेंबर) स्क्वाड्रनने ‘द चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पटकाविला.
अरुप राहा म्हणाले, प्रबोधिनीतील प्रशिक्षणाद्वारे स्नातकांचे सक्षम, लढवय्या सैनिकांमध्ये रुपांतर होते. सैन्यदलात सेवा बजावताना प्रत्येकालाच सातत्याने विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे. सैन्यदलाचे प्रतिनिधित्व करताना आणि भविष्यामध्ये नेतृत्व करताना सर्व सहकाऱ्यांमध्ये कुटुंबाची जाणीव विकसित करणे गरजेचे आहे.
संचलनाच्या प्रारंभी भारतीय ध्वज आणि लष्कराचा ध्वज फडकाविणाऱ्या चेतक हेलिकॉप्टर्सनी मानवंदना दिली. सुपर डिमोना, पिटालस या प्रशिक्षण विमानांसह जग्वार आणि सुखोई ३० या लढाऊ विमानांनी सलामी दिली. तर, संचलनाच्या सांगतेला जग्वार आणि सुखोई विमानांनी कोलांटी उडी घेत आणि आकाशात सरळ उभे राहण्याच्या कसरती सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
खडतर प्रशिक्षणाची आनंददायी सांगता
प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा हे कठीण प्रशिक्षण जमेल की नाही अशी शंका होती. मात्र, तीन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर छातीवर पदक मिरवताना या खडतर प्रशिक्षणाची आनंददायी सांगता झाली असल्याची भावना पदकविजेत्या स्नातकांनी व्यक्त केली. सुवर्णदकविजेता राहुल कदयान हा केरळमधील नौदल प्रशिक्षण केंद्रामध्ये तर, रौप्यपदकविजेता विवेक यादव आणि कांस्यपदकाचा मानकरी सूर्य प्रकाश हे दोघे डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमीमध्ये (इंडियन मिलिटरी अॅकॅडमी) पुढील प्रशिक्षण घेणार आहेत.
माझे वडील नौदलामध्ये कोस्ट गार्ड म्हणून कामाला आहेत. त्यांनीच मला लष्करामध्ये येण्याची प्रेरणा दिली. घरचे जेवण आणि मित्रांचा सहवास याला मुकलो असलो तरी काही दिवसांत सारे सुरळीत पार पडले. या प्रशिक्षणाने जीवनाचे ध्येय निश्चित केले असल्याचे राहुल कदयान याने सांगितले. वडिलांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून मी येथे आलो. जपानमध्ये इंटरनॅशनल कॅडेट कॉन्फरन्ससाठी माझी निवड झाली होती. प्रशिक्षण खडतर असले तरी चांगल्या आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाल्याचे विवेक यादव याने सांगितले. श्रीनगर येथे वडील राज्य राखीव पोलीस दलात अधिकारी असले तरी लष्करामध्ये येणारा घराण्यातील मी पहिलाच असल्याचे सूर्य प्रकाश याने सांगितले. या तीन वर्षांच्या खडतर पण आनंददायी प्रशिक्षणाची मला सातत्याने आठवण होत राहील, असेही तो म्हणाला.