धुक्याची दुलई पांघरून अवतरलेली शनिवारची रम्य सकाळ.. समोरचे काही दिसूच नये इतके दाट धुके.. घोषपथकाने वाजविलेली ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘सारे जहाँसे अच्छा हिंदूोस्ता हमारा’ या गीतांची धून.. या तालावर छात्रांच्या शिस्तबद्ध पावलांनी घडविलेले संचलन.. संचलनानंतर हवेत टोप्या आणि सहकाऱ्यांना भिरकावून देत छात्रांनी व्यक्त केलेला आनंद.. अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२९ व्या तुकडीचे शानदार दीक्षांत संचलन झाले. प्रमुख पाहुण्यांनी मानवंदना स्वीकारल्यानंतर सुखोई-३० आणि मिग विमानांचे ‘फ्लाय पास्ट’ झाले खरे. पण, दाट धुक्यामुळे विमानांचे दर्शन होऊ शकले नाही.
प्रबोधिनीच्या १२९ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन शनिवारी अरुण खेत्रपाल मैदानावर झाले. नौदलप्रमुख आर. के धोवन यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, एअर मार्शल अजित भोसले, प्रबोधिनीचे कमांडंट व्हाईस अ‍ॅडमिरल जी. अशोककुमार, उपप्रमुख ब्रिगेडिअर एस. के. राव या वेळी उपस्थित होते. पी. के. मोहंती याला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक, अभिषेक कुंडलिया याला रौप्यपदक आणि अनमोल रावत याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले. ‘पी’ स्क्वाड्रनला ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ने गौरविण्यात आले. दीक्षांत संचलनामध्ये १२९ व्या तुकडीच्या ३३८ छात्रांनी सहभाग घेतला. त्यापैकी २२९ छात्रांनी लष्कराचे, ४० छात्रांनी नौदलाचे आणि ९६ विद्यार्थ्यांनी हवाई दलाचे प्रशिक्षण घेतले आहे. याव्यतिरिक्त परदेशातील १८ छात्रांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यामध्ये भूतान आणि तजाकिस्तानच्या प्रत्येकी चार, मालदीव, अफगाणिस्तान आणि फिजी येथील प्रत्येकी दोन छात्रांचा समावेश आहे.
प्रबोधिनीतून उत्तीर्ण होणाऱ्या छात्रांनी नेतृत्व, शौर्य, दया, विश्वासार्हता आणि एकाग्रता या पाच तत्त्वांचा अवलंब करून देशासाठी सर्वोच्च सेवा देण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षा आर. के. धोवन यांनी व्यक्त केली. एनडीए ही नेतृत्व आणि एकात्मिकता विकसित करणारी संस्था आहे. त्यामुळे ही जगातील सर्वोत्तम संस्थांपैकी एक आहे. येथून आतापर्यंत बाहेर पडलेल्या ३३ हजारांहून अधिक छात्रांनी देशाच्या संरक्षणासाठी तीनही दलांमध्ये योगदान दिले आहे. त्या शंृखलेमध्ये आता तुम्ही समाविष्ट होणार आहात, असेही त्यांनी सांगितले. आपल्या पाल्याला एनडीएमध्ये पाठवून त्यांना देशाच्या संरक्षणासाठी तयार करण्यासाठी भक्कम पाठिंबा देणाऱ्या पालकांचे धोवन यांनी मनापासून अभिनंदन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा