‘कदम कदम बढाये जा’, ‘सारे जहाँसे अच्छा’, ‘जननी जन्मभूमी’ या गीतांच्या धूनवर छात्रांचे लयबद्ध संचलन.. एमआय-१७-व्ही ५ हेलिकॉप्टर, सुपर डिमोना आणि सुखोई विमानांची उड्डाणे.. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हवेत भिरकावलेल्या टोप्या.. सामुदायिक सूर्यनमस्कार घालून व्यक्त झालेला आनंद.. अशा वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १२७ व्या तुकडीचे शनिवारी शानदार दीक्षान्त संचलन झाले. लष्करी अधिकाऱ्यांची भावी पिढी ही देखील सैन्यदलात सहभागी होत देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
प्रबोधिनीतील १२७ व्या तुकडीच्या ३५५ छात्रांनी अरुण खेत्रपाल संचलन मैदानावर शानदार संचलनाचे प्रात्यक्षिक सादर करीत आपल्या प्रशिक्षणाची सांगता केली. यामध्ये ताजिकिस्तान येथील दहा आणि अफगाणिस्तानमधील पाच छात्रांचा सहभाग होता. लष्करप्रमुख जनरल दलबिर सिंह सुहाग यांनी या दीक्षान्त संचलनाची पाहणी करीत मानवंदना स्वीकारली. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अशोक सिंह, प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल आर. के. एस. भदुरिया आणि उपप्रमुख मेजर जनरल अशोक आंब्रे या वेळी उपस्थित होते. अर्पित सांगवान याला राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. ललित थापलियाल हा रौप्यपदकाचा आणि अग्रिम शर्मा हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला. ‘नोव्हेंबर स्क्वाड्रन’ला (एन स्क्वाड्रन) ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ प्रदान करण्यात आला.
अर्पित सांगवान आणि ललित थापलियाल या दोघांचे वडील थेट लष्करी सेवेमध्ये असल्याने त्यांना घरातूनच प्रेरणा मिळाली. एवढेच नव्हे तर योग्य प्रकारे मार्गदर्शनही मिळाले. थापलियाल याचे वडील लष्करी संस्थेमध्ये उपप्राचार्य असून त्याची बहीण स्वर्णिमा ही सिकंदराबाद येथे हवाई दलामध्ये कार्यरत आहे. अर्पित सांगवान याचे वडील दिल्ली येथे नौदलामध्ये अधिकारी आहेत. तर, अग्रिम शर्मा याचे वडील ब्रिगेडिअर असून ते सध्या भोपाळ येथे कार्यरत आहेत.
माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आहे. कुटुंबीय आणि मित्रांनी मला येथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा दिल्याचे अर्पित सांगवान याने सांगितले. लष्करी सेवेची आणि देशभक्तीची माझ्या घराण्याची परंपरा सुरू ठेवण्याचे काम करीत असून सेवेमध्ये मी शंभर टक्के योगदान देणार असल्याचे अग्रिम शर्मा याने सांगितले. ललित थापलियाल याचा गोरखा रेजिमेंटमध्ये सेवा करण्याचा मानस आहे.
एक नवी ऊर्जा घेऊन आपण सारे देशाच्या लष्करामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहात. आपल्या क्षमता सिद्ध करण्याबरोबरच प्रामाणिकपणा आणि एकात्मिक कार्यकुशलता आपल्या अंगी बाणवण्याची शक्ती या खडतर प्रशिक्षणाने आपल्यामध्ये आली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण आपल्या समर्थ खांद्यावर असून राष्ट्रीय आपत्तीच्या काळातही योगदान देण्याची तयारी ठेवावी. या आव्हांनाना सामोरे जाण्याचे सामथ्र्य या प्रशिक्षणाने आले असल्याचे लष्करप्रमुख दलबिर सिंह सुहाग यांनी छात्रांना उद्देशून सांगितले.
दीक्षान्त संचलनाचे औचित्य साधून प्रबोधिनीच्या २७ व्या तुकडीतील छात्रांचा स्नेहमेळावा ‘एनडीए’च्या प्रांगणात भरला होता. लष्करामध्ये अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले माजी छात्र आपल्या कुटुंबीयांसमवेत जुन्या स्मृतींमध्ये रंगून गेले. लष्करप्रमुखांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.
आठ वर्षांच्या मैत्रीचा मार्ग वेगळा
डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मेडिकल कॉलेजमध्ये इयत्ता आठवी ते बारावी आणि नंतर पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण अशी साथसोबत करणाऱ्या राष्ट्रपतिपदक विजेता अर्पित सांगवान आणि रौप्यपदकाचा मानकरी ठरलेला ललित थापलियाल या दोघांच्या आठ वर्षांच्या मैत्रीचा मार्ग वेगळा झाला. देशाच्या सीमांचे रक्षण हे उद्दिष्ट सामायिक असले, तरी ललित हा डेहराडून येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मिलिटरी अ‍ॅकॅडमी येथे दाखल होऊन भविष्यामध्ये गोरखा रेजिमेंटमध्ये काम करण्याचे ध्येय बाळगून आहे. तर, अर्पित याला वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नौदलामध्ये काम करण्याची इच्छा असून तो केरळ येथील इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी दाखल होत आहे. मार्ग वेगळा असल्याने एकमेकांपासून दूर व्हावे लागत असल्याचे दु:ख जरूर आहे. पण, एनडीए प्रशिक्षण कालावधीत आम्ही उत्तम कामगिरी बजावली आहे. आता आमच्यावर देशाची सेवा करण्याची जबाबदारी आली असून ती चोखपणाने पार पाडू, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा