सध्याचे राज्यकर्ते पाहता राष्ट्र कसे घडणार, याविषयी चिंता वाटते. सीमेवर लढणाऱ्या जवानांचे शिर कापून नेले जाते आणि पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री प्रत्युत्तर देण्याऐवजी केवळ निषेधाची भाषा करतात. शेकडो जणांचे प्राण गेले, त्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची फाशी रद्द केली जाते. अहिंसक होता-होता आपण नपुंसक तर होत नाही ना, असे प्रश्न करत आजच्या परिस्थितीत देश बलवान करण्यासाठी आणखी एक शिवाजी जन्माला आला पाहिजे, असे प्रतिपादन सिने नाटय़ अभिनेते शरद पोंक्षे यांनी चिंचवड येथे केले.
हिंदूू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने पोंक्षे यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते ‘हिंदूू कुलभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. या वेळी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पं. धर्मवीर आर्य व्यासपीठावर होते. रविवारी सुटीच्या दिवशी सकाळी दहाला कार्यक्रम असूनही सभागृह तुडुंब भरले होते. पोंक्षे यांनी पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक दाखले देत राजकारण, समाजकारण, महिला अत्याचार, बलाढय़ अमेरिका, भारताचे दुबळे नेतृत्व, इटलीचे आयात नेतृत्व, हिंदूूइझम आदी विषयांवरील आपली सडेतोड मते मांडली, त्यास उपस्थितांकडून जोरदार दाद मिळाली.  
पोंक्षे म्हणाले,‘‘शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावा, असे प्रत्येकाला वाटते. शिवाजीचा जन्म होण्यासाठी आधी जिजाऊ जन्माला यायला हवी. मात्र, जिजाऊच जन्माला यायच्या बंद झाल्याने शिवाजीही जन्माला येत नाहीत. जोरजोराने घोषणा देणारे हातात शस्त्र घेतीलच, असे काही नसते. मेणबत्त्या घेऊन आंदोलन करणाऱ्यांमध्ये पेटवण्याची हिम्मत नसते. देश अराजकतेकडे चालला आहे. रामभक्त म्हणवून घेणेदेखील पाप ठरते आहे. राक्षसांचा नायनाट करणारे आपले देवदेवता शस्त्रधारी आहेत, मग आपण अिहसक कसे झालो?  नको तिथे अिहसा पाळल्याने आपले वाटोळे होत चालले आहे. हिंदूुत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदूू हा धर्म नव्हे, तर जगण्याची पध्दत आहे, असे ते म्हणाले. कृष्णकुमार गोयल यांनी प्रास्ताविक केले. उत्तम दंडिमे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे चित्र लावण्यास पोलीस अटकाव करतात,जो खराखुरा इतिहास आहे. अफजलखान हा काही धर्मगुरू नव्हता, तो शिवाजीला मारण्यासाठीच आला होता. ते छायाचित्र भारतात, महाराष्ट्रात नाही लावायचे तर काय पाकिस्तानात लावायचे का, असा मुद्दा शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.