पुणे : पुणे रेल्वेस्थानकावर रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत होते. रिक्षाचालकांकडून सुरू असलेली प्रवाशांची ही लूट रोखावी, अशी मागणी केली जात होती. अखेर प्रवाशांची फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वेस्थानकावरील रिक्षामित्र ही प्रीपेड रिक्षासेवा शनिवारपासून ( २७ जुलै) सुरू झाली आहे.

रेल्वेस्थानकावरील प्रीपेड रिक्षा बूथ करोना संकटाच्या काळात सुरू होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते बंद झाले. प्रीपेड बूथ बंद झाल्यानंतर काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारण्यास सुरुवात केली. याबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. अखेर चार वर्षांनी प्रीपेड बूथ पुन्हा सुरू करण्याची पावले उचलण्यात आली. यासाठी रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे महापालिका आणि रिक्षा संघटनांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुणे स्थानकावर रिक्षामित्र ही सेवा सुरू झाली आहे.

आणखी वाचा-पुणे : आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त

रिक्षामित्र ही सेवा जुन्याच प्रीपेड रिक्षा बूथमध्ये सुरू केली जात आहे. यासाठी रिक्षाचालकांची नोंदणीही करण्यात आली आहे. प्रीपेड रिक्षा बूथमध्ये मीटरनुसार प्रवाशाला भाडे आकारले जाणार आहे. याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रवासाच्या मार्गाचे ट्रॅकिंग मोबाइलवरून पाहता येतील. ट्रॅकिंगची सुविधा प्रवाशांच्या नातेवाइकांनाही मिळेल. रिक्षामित्र सेवेचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले, अशी माहिती ‘बघतोय रिक्षावाला फोरम’चे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.

अशी असेल प्रीपेड रिक्षा सेवा…

  • प्रवाशाला बूथमध्ये जाऊन प्रवासाचे ठिकाण सांगावे लागेल.
  • ठिकाणानुसार बूथमधील कर्मचारी मीटरनुसार भाडे सांगतील.
  • प्रवाशाला बूथमधून देयकाची एक पावती मिळेल.
  • इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर पावतीवरील रक्कम प्रवासी रिक्षाचालकाला देईल.
  • प्रवासादरम्यान बूथमधील कर्मचारी, प्रवासी हे रिक्षाचा प्रत्यक्षातील मार्ग पाहू शकतील.
  • प्रवाशांचे नातेवाईकही रिक्षाचा मार्ग ऑनलाइन मोबाइलवर पाहू शकतील.

आणखी वाचा-विधानसभा निवडणुकीत मतदान करायचेय? कधीपर्यंत होणार मतदार नोंदणी?

रिक्षाचालकांना प्रोत्साहनपर सवलती

प्रीपेड रिक्षा बूथच्या उद्घाटनावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रिक्षाचालकांना प्रोत्साहनपर सवलती देण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, रिक्षा बूथवरील सुविधा नि:शुल्क असेल. बूथवर नोंदणी केलेल्या सर्व रिक्षाचालकांना दोन गणवेश मोफत दिले जातील. याचबरोबर या रिक्षाचालकांना महिना एक हजार रुपयांचे सीएनजीचे कूपन दिले जाईल. तसेच, त्यांना अल्प दरामध्ये रिक्षाचे सुटे भाग देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. रिक्षाचालक व त्यांच्या कुटुंबीयांना दरमहा मोफत दंतचिकित्सा, डोळ्यांची तपासणी व चष्मेवाटप तसेच रक्त तपासणी व एक्स-रे ची सुविधा देण्यात येईल.