समृद्ध जंगलात ‘वन उद्यान’च्या नावाखाली वृक्षतोड
पुणे : पुणेकरांना ऑक्सिजन पुरविणारी टेकडी म्हणून तळजाई टेकडीवरील संरक्षित जंगलाचा लौकिक आहे. या लौकिकाला आता ग्रहण लागले आहे. ‘वन उद्यान’ करण्याच्या नावाखाली वन विभागाकडूनच जंगलाचे विद्रूपीकरण सुरू आहे. कुणाचीही मागणी नसताना, गरज नसताना झाडे तोडून खुले प्रेक्षागृह बांधण्याचा पराक्रम वन विभागाने करून दाखविला आहे.
वन विभागाकडून या जंगलाचे संवर्धन होण्याची अपेक्षा असताना वन उद्यान करण्याच्या नावाखाली टेकडीवर ध्यान केंद्रे, पॅगोडा, जंगलातील वाटांवर बसण्यासाठी सिमेंटचे बाक बांधले जात आहेत. टेकडीवर झाडांचे संवर्धन करण्याऐवजी, जंगलाचे पर्यावरण जपण्याऐवजी क्रॉंक्रिटीकरण करून नागरिकांना सुविधा देण्याच्या नावाखाली आलेला निधी मुरविण्याचेच काम सुरू आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तळजाई टेकडीवर नुकतेच खुले निसर्ग प्रेक्षागृह उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतेच झाले आहे. या कार्यक्रमातच पालकमंत्र्यांनी काँक्रिटीकरणाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. प्रेक्षागृहाची मागणी कुणी केली होती? टेकडीवर फिरावयास येणाऱ्या नागरिकांना प्रेक्षागृह काय कामाचे? याचे उत्तर वन विभागाकडे नाही. प्रेक्षागृहाच्या ठिकाणी दाट झाडी होती, ती तोडून प्रेक्षागृह उभारले आहे. झाडांना सिमेंटचे कठडे केले जात आहेत. केवळ निधी मुरविण्यासाठीच ही उठाठेव झाल्याचा आरोप तळजाईप्रेमी करीत आहेत.
तळजाई टेकडीवरील वन विभागाकडील संरक्षित जंगल एकूण २५० हेक्टरवर पसरलेले आहे. यापैकी फक्त अडीच एकर क्षेत्र नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी राखीव आहे. आवश्यक सुविधा निर्माण झाल्यास वनसंपदा सुरक्षित राहणार आहे. मात्र, लोकांचा विरोध असेल तर यापुढे तळजाईवर कोणतेही बांधकाम करताना विचार करू. तळजाईवर पर्यावरणाला घातक असलेल्या उंदीरमारी (ग्लिरिसीडिया) झाडांचे पूर्णपणे उच्चाटन केले जात आहे. नव्याने लागवड केलेल्या झाडांसाठी ठिबकने पाणी देण्याचे नियोजन आहे. देशी झाडांची लागवड आणि संवर्धन करीत आहोत. बांबू उद्यानात जगभरातील विविध जातींच्या बांबूंची लागवड केली आहे.– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे विभाग
तळजाईवर वन विभागाकडून देशी झाडांचे वृक्षारोपण केले जात आहे. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय केली जात आहे. चांगली कामे सुरू असताना लोकांच्या सोयीचे कारण पुढे करून सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. कुणाचीही मागणी नसताना प्रेक्षागृह का बांधले आहे, हे कळायला मार्ग नाही.– सचिन पुणेकर, माजी सदस्य संयुक्त वन व्यवस्थापन समिती
शहरात सुमारे १८० आणि आता मोठय़ा सोसायटय़ांमध्येही प्रेक्षागृहांची सोय असताना, जंगलात प्रेक्षागृहाची गरजच काय? तळजाईसाठी आलेल्या निधीतून सीमाभितींचे काम पूर्ण करता आले असते. त्यामुळे कुत्री, डुकरांचा वावर नियंत्रित करता आला असता. लोकांनाही शिस्त लागली असती.– महेश वाबळे, माजी नगरसेवक