महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढती संख्या पाहून या आरोपींना तत्काळ अटक करून अशा गुन्ह्य़ांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात स्वंतत्र महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष सुरू करण्यातस आला आहे. याच धर्तीवर पुण्यातही महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष सुरू करण्याचा विचार पुणे पोलीस करत आहे. त्यासाठी संख्याबळाची चाचपणी सुरू आहे. 
अलिकडच्या काळात महिलांवर बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार व महिलांना आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. या गुन्ह्य़ांचा सखोल व परिपूर्व पद्धतीने तपास करून आरोपींविरुद्ध तत्काळ खटले दाखल करणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून महिलांवरील अत्याचारांबाबत दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांचा तातडीने तपास करण्यासाठी राज्य शासनाने एक परिपत्रक काढून दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलीस आयुक्तालयात हा कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यांच्या अधिपत्याखाली हा कक्ष काम करणार आहे. या कक्षामध्ये काम करण्यासाठी महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही असा महिला अत्याचार प्रतिबंधक कक्ष सुरू करण्याचा विचार पुणे पोलिसांचा आहे. त्यासाठी संख्याबळ किती लागेल, त्याचा खर्च किती असेल, याची चाचपणी सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून लवकरच पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात येणार आहे.