पिंपरी : शहरी भागात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. त्यासाठी कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांची गरज निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे अन्य महापालिकांनीही असे प्रकल्प उभारणे आवश्यक झाले आहे, असे मत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.
डॉ. पुलकुंडवार यांनी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी केली. महापालिकेच्या पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापन पद्धतीचे त्यांनी कौतुकही केले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहआयुक्त पूनम मेहता, महापालिका आयुक्त शेखर सिंह, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बंसल, उपअभियंता योगेश आल्हाट यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुणे : वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी मोशीतील कचरा डेपोमधील राडारोडा व्यवस्थापन केंद्र, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, इंधननिर्मिती, प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉक, हॉटेल कचऱ्यापासून सीएनजी गॅस या प्रकल्पांना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तांत्रिक बाबींसह प्रकल्पाची माहिती घेतली.
शहर झपाट्याने विस्तारत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर कचऱ्याची समस्याही गंभीर होत आहे. त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे. शहरात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारचा घनकचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत पिंपरी महापालिकेने एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ती यशस्वीपणे सुरू आहे. अशा प्रकारचे प्रकल्प प्रत्येक शहरात राबवणे आवश्यक असल्याचे डॉ. पुलकुंडवार म्हणाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा राज्यातील पहिलाच प्रकल्प उभारला आणि ताे यशस्वी करून दाखविला आहे. कचऱ्याचा ढीग कमी होत आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, १४ मेगावॅट वीज निर्मिती हाेत असल्याचे पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.