‘आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारतीय शिक्षणसंस्था नाहीत म्हणजे त्यांना जागतिक स्तरावर गृहित धरले जात नाही किंवा ती दर्जेदार नाहीत, हा शिक्षणव्यवस्थेतील मोठा गैरसमज असून तो बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च’ (आयसर) या संस्थेच्या पुणे शाखेच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. गणेशन आणि संस्थेतील प्राध्यापक उपस्थित होते.
या वेळी इराणी म्हणाल्या, ‘भारतीय शिक्षणसंस्था जागतिक क्रमवारीत दिसत नाहीत म्हणजे त्या दर्जेदार नाहीत हा आपल्या शिक्षणव्यवस्थेतील गैरसमज आहे. तो दूर करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्याच हेतूने देशातील विद्यापीठांची राष्ट्रीय क्रमवारी निश्चित करण्याची यंत्रणा सुरू करण्यात आली असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात देशातील साडेतीन हजार शिक्षणसंस्थांनी नोंदणी केली आहे. शिक्षण व्यवस्थेत दुसरा मोठा गैरसमज आहे तो विज्ञान शिक्षणाबाबत. संशोधन खर्चिक तेवढे चांगले असा गैरसमज दिसून येतो. मात्र अनेक भारतीय शास्त्रज्ञ कमी खर्चात उत्तम संशोधन करत आहेत. आपल्याकडे इंग्रजीत झालेले संशोधनच गृहित धरले जाते. मात्र स्थानिक भाषांमध्येही खूप चांगले संशोधन होत असते. भाषेबाबत अनेक मुलांमध्येही न्यूनगंड दिसून येतो. अगदी प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवलेली मुले इंग्रजीच्या धास्तीने मागे पडतात. भाषेबाबत असलेला हा गंड कमी करून विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यासाठी संस्थांनी अधिक प्रयत्न केले पाहिजेत.’ ‘आयसरमध्ये शिक्षण घेण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र हे स्वप्न पूर्ण होऊ न शकलेल्या एखाद्या तरी विद्यार्थ्यांला तुम्ही मदत करा,’ असे आवाहन इराणी यांनी विद्यार्थ्यांना केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा