भांडवलदारांच्या रुग्णालयांवरून माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांची टीका
राज्यामध्ये भांडवलदारांची रुग्णालये उभी राहात आहेत. येथे उपचार घेताना रुग्णाचे आर्थिक भांडवलच संपून जाते. तरी, त्याच्यावर अपेक्षेप्रमाणे उपचार होतातच असे नाही. त्यामुळे माफक दरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा मिळण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
कृष्णकांत कुदळे पतसंस्था, कृष्णकांत कुदळे फाउंडेशन आणि नर्गिस दत्त पतसंस्थेतर्फे आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात पाटील बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, उपमहापौर मुकारी अलगुडे, कृष्णकांत कुदळे, मंगला कुदळे, मोहन टिल्लू या वेळी उपस्थित होते. पाटील यांच्या हस्ते कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांना सुनील दत्त पुरस्कार, अभिनेत्री अनुजा साठे हिला नर्गिस दत्त पुरस्कार आणि रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. परवेझ ग्रांट यांना शंतनूराव किलरेस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, सहकारमहर्षी काकासाहेब थोरात नागरी सहकारी पतसंस्थेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बापट म्हणाले, समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात. मात्र, केवळ नकारात्मक गोष्टीच माध्यमातून समाजापुढे येतात. चांगल्या गोष्टी समाजासमोर आल्यास सकारात्मक बदल घडून येतील.
डॉ. ग्रांट म्हणाले, रुबी हॉल क्लिनिकद्वारे प्रत्येक महिन्यात विविध विकारांच्या ३० रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जातात. त्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो. आरोग्य सेवेबद्दल पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा