पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रमाण वाढले असून, सोसायटीधारकांना विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. सोसायट्यांमध्ये अंतर्गत वादही आहेत. या समस्या सोडविण्यासाठी ‘तंटामुक्त गाव’ अभियानाच्या धर्तीवर ‘तंटामुक्त सोसायटी’ अभियान शहरांमध्ये प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार ; तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सोसायट्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस, माजी नगरसेवक माया बारणे आणि संतोष बारणे यांच्या वतीने ‘सोसायटीधारकांशी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते.कार्यक्रमाला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मयूर कलाटे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांनी त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची निवेदने पवार यांच्याकडे सादर केली.
हेही वाचा >>>पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणावर शस्त्राने वार
पवार म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये सोसायट्यांचे प्रमाण जास्त आहे. सोसायटीधारक नियमितपणे कर भरतात. सोसायटीतील अंतर्गत कामांचा खर्च तेच करतात. तरीही सोसायटीधारकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. सोसायट्यांमध्ये अंतर्गत वादही आहेत. त्यामुळे ‘तंटामुक्त गाव’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘तंटामुक्त सोसायटी’ अभियान शहरात राबवावे लागेल. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा उपक्रम राबवण्यात आला, तेव्हा ३५ प्रकारचे मुद्दे पुढे आले होते.सोसायटीधारकांच्या मेळाव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात निवेदने प्राप्त झाल्याचे सांगून पवार म्हणाले की, यासंदर्भात महापालिका आणि पीएमआरडीएचे आयुक्त; तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित केली जाईल. एकाच मेळाव्यात सर्व प्रश्न सुटणार नाही. सोसायटीधारकांच्या समस्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरी भागातील प्रश्नही वाढले आहेत.
हेही वाचा >>> यंदा पुणे शहरात २०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद
मालकी वृत्ती वाढते
सोसायटीमध्ये सदनिका घेतल्यावर सदनिकाधारकांमध्ये मालकी वृत्ती वाढते. काही जणांना आपण सोसायटीचे मालकच झाल्यासारखे वाटते. कुत्रा-मांजर पाळण्यावरून हमखास वाद होतात. वाहने लावण्यावरून; तसेच मुलांच्या खेळण्यावरून भांडणे होतात, असे पवार यांनी सांगितले.