रात्री-अपरात्री शहराच्या वेगवेगळ्या भागांतून भरधाव जाणारे बुलेटस्वार आणि त्यांच्या गाड्यांतून निघणाऱ्या फटाक्यासारख्या आवाजामुळे धडकी भरल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांकडे करण्यात येतात. असे आवाज काढणाऱ्या बुलेट, तसेच दुचाकीस्वारांविरुद्ध कोंढवा आणि लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली. कोंढवा पोलिसांनी गाड्यांचे सायलेन्सर तर जप्त केलेच, पण सायलेन्सरवर महापालिकेचा ‘रोडरोलर’ चालवून ते नष्टही केले. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, धडकी भरवणाऱ्या सायलेन्सरवर कारवाई फक्त एका भागात न करता संपूर्ण शहरात केल्यास सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांना जरब बसेल.
कर्णकर्कश आवाज काढणाऱ्या ‘सायलेन्सर’चा अलीकडे सर्रास वापर केला जातो. रुग्णवाहिका, पोलिसांच्या वाहनांवरील भोंगे, जोरात ओरडण्याचे आवाज, तसेच फटाका फुटल्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर तरुण दुचाकींना बसवितात. मात्र, हेच ‘सायलेन्सर’ शहराची शांतता भंग करत असून, सामान्यांच्या दृष्टीने हे ‘सायलेन्सर’ तापदायक ठरले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना तर या ‘सायलेन्सर’चा मोठा त्रास होतो. शाळा, रुग्णालयांच्या परिसरात मोठ्याने हॉर्न वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे फलक शाळा, महाविद्यालय, तसेच रुग्णालयांच्या परिसरात लावण्यात आले आहेत. मात्र, अशा फलकांची कोण पर्वा करतो?
अशा प्रकारच्या ‘सायलेन्सर’वर पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली होती. शहर, तसेच उपनगरांतील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी वसतिगृहांच्या परिसरातील रहिवासी भागात रात्री-अपरात्री दुचाकीस्वार तरुण भरधाव जातात. फटाक्यासारखा आवाज झाल्याने गाढ झोपेत असलेले नागरिक दचकून जागे होतात. पोलिसांकडे तक्रार करेपर्यंत दुचाकीस्वार पसार होतात. उपनगरांत तर रात्री-अपरात्री दुचाकीस्वार तरुण वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करतात. वेगामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अशा प्रकारच्या घटना रोखणे, तसेच वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शहरात अचानक नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. यापुढील काळात अचानक नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केल्यास नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना जरब बसेल.
यावरील कारवाई व्यापक करण्यासाठी ‘सायलेन्सर’ तयार करणारे, तसेच विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे आहे. फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्या सायलेन्सरना ‘इंदोरी फटाका’ असे म्हटले जाते. ‘सायलेन्सर’मध्ये फेरफार करून गॅरेजचालक दुचाकींना बसवून देतात. पुणे शहरात वाहनांचे सुटे भाग विकणारी मोठी बाजारपेठ एका विशिष्ट भागात आहे. सायलेन्सर, चित्रविचित्र आवाज काढणाऱ्या हॉर्नची विक्री या भागातून होते. पोलिसांनी यापुढील काळात सायलेन्सर बसवून देणारे गॅरेजचालक, निर्माते, विक्रेत्यांवर कारवाई केल्यास त्याचे निश्चित परिणाम दिसतील. नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता वाहतूक, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी कारवाईत सातत्य ठेवल्यास अशा प्रकारच्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या तरुणाईला जाब बसेल, तसेच गॅरेजचालक, सायलेन्सर, हॉर्न तयार करणारे उत्पादक, विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य सूचना दिल्यास आपोआप सायलेन्सर वापराला आळा बसेल.
दैनंदिन गुन्हे, गुंडांविरुद्ध कारवाई, बंदोबस्त, वाहतूक नियोजन, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर आहे. परंतु, सायलेन्सरवरही प्रभावी कारवाई गरजेची आहे. ‘समाजस्वास्थ्य’ चांगले राहावे, यासाठी अनेकदा चाकोरीबाहेर जाऊन काम करावे लागते. पोलिसांनी मनात आणले, तर आठवडाभरात धडकी भरवणारे सायलेन्सर आणि हाॅर्न हद्दपार होतील, यात शंका नाही.
rahul.khaladkar@expressindia.com