छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र वाचताना केवळ भावनिक आंदोलनात गुरफटून न जाता नवनिर्मितीची स्वप्नेदेखील पाहिली पाहिजेत. तलवार आणि लढाई यापेक्षाही त्यांचे व्यक्तित्व वेगळे आहे. शील आणि सामथ्र्य या दोन्हीचा मिलाफ असलेले शिवाजीमहाराज यांच्या व्यक्तिमत्त्वातील कुशल प्रशासक, बहुजनांचा कैवारी, बहुभाषा पंडित अशा विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकणाऱ्या नव्या शिवचरित्र लेखनाची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि पहिल्या छत्रपती शिवाजीमहाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी व्यक्त केले. केवळ जयजयकार करून शिवाजीमहाराज आपल्याला समजणार नाहीत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणारदेखील नाहीत. त्यासाठी विविध भाषांतील विद्वानांनी एकत्र येऊन शिवचरित्राचे हे शिवधनुष्य पेलावे, असे आवाहन त्यांनी केले.
पुणे महापालिकेतर्फे आयोजित पहिल्या छत्रपती शिवाजीमहाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी डॉ. आ. ह. साळुंखे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवींद्र माळवदकर, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे शरद गोरे, दशरथ यादव आणि राजकुमार काळभोर याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, जगातील विविध राजकीय विश्लेषक आणि भाष्यकारांनी शिवाजीमहाराजांचे वर्णन केले आहे. पाच-दहा वर्षांत काळ बदलतो. पण, इतक्या वर्षांनंतरही शिवचरित्र कालबाह्य़ झालेले नाही. समाजातील बहुसंख्य माणसे सज्जन, सद्गुणी आणि चारित्र्य जपणारी असतात. असे असतानाही शोषण का होते.
सज्जनांचा प्रभाव वाढून समाजही सज्जन झाला पाहिजे. पण, सज्जन माणसे दुर्जनशक्तीला रोखून धरण्याइतकी सामथ्र्यशाली नसतात. काही मोजकी माणसे सामथ्र्यशाली असतात. पण, खेदाची गोष्ट म्हणजे त्यांच्याजवळ चारित्र्य नसते आणि सज्जनांचे रक्षण करण्याची बुद्धी त्यांच्यापाशी नसते. शील आणि सामथ्र्य अशा दोहोंचा मेळ असलेले शिवाजीमहाराज हे मानव जातीतील दुर्मिळ उदाहरण आहे.
माणसाने भावनाशील असलेच पाहिजे. पण, शिवाजीमहाराजांच्या चरित्राबाबत केवळ भावनिक राहून उपयोगाचे नाही. तर, या शिवचरित्रापासून प्रेरणा घेतली पाहिजे. ही तयारी नसेल तर, केवळ भावनिक आंदोलने होतच राहतील. समग्र गुणांचा अभ्यास करून नव्याने शिवचरित्राचे लेखन करण्यासाठी एका व्यक्तीला २५ जन्म पुरणार नाहीत. त्यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रजी या पाश्चात्य भाषांबरोबरच मोडी, उर्दू, पर्शियन, अरेबिक अशा भाषांच्या २५ अभ्यासकांनी एकत्र येऊन आंतरविद्याशाखीय अभ्यासाद्वारे शिवचरित्राचे लेखन करणे योग्य ठरेल.
साहित्य संमेलन कोणाचे?
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेतर्फे पुणे महापालिकेच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित करण्यात आले असल्याचे सूत्रसंचालकाने प्रारंभी सांगितले. त्यावेळी स्वागताध्यक्ष रवींद्र माळवदकर म्हणाले, पुणे महापालिका या संमेलनाची आयोजक आहे. हे संमेलन सुयोग्य होण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेला बरोबर घेतले आहे याचे भान सर्वानी ठेवले पाहिजे.
युवा पिढीसाठी नव्या शिवचरित्र लेखनाची आवश्यकता- डॉ. साळुंखे
छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र वाचताना केवळ भावनिक आंदोलनात गुरफटून न जाता नवनिर्मितीची स्वप्नेदेखील पाहिली पाहिजेत. तलवार आणि लढाई यापेक्षाही त्यांचे व्यक्तित्व वेगळे आहे. शील आणि सामथ्र्य या दोन्हीचा मिलाफ असलेले शिवाजीमहाराज यांच्या व्यक्तिमत्त्वातील कुशल प्रशासक, बहुजनांचा कैवारी, बहुभाषा पंडित अशा विविध …
आणखी वाचा
First published on: 18-02-2013 at 10:12 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to write new biography of shivaji maharaj