नेत्रदानासाठीचे अर्ज भरून घ्यायच्या मोहिमा होतात, हजारो अर्ज भरले जातात, मात्र अर्ज भरलेल्या व्यक्तींचे त्यांच्या मृत्यूपश्चात खरोखरीच नेत्रदान केले जाते का, हे जाणून घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे अनेक सोपस्कारांनी भरून घेतलेले हे अर्ज केवळ रद्दी कागदच ठरतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ससून सवरेपचार रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीवनी अंबेकर म्हणाल्या, ‘‘आठ-नऊ वर्षांपूर्वी सरकारतर्फे नेत्रदानाचे अर्ज भरून घेण्यासाठी पुरविले जात. भरून घेतलेल्या अर्जाची नोंद ठेवली जायची. मात्र अर्ज भरलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर नेत्रदान झाले की नाही हे कळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. अर्जाचा पाठपुरावा करणे शक्य नसल्याने ते भरून देण्याचा उपयोग होत नाही. अर्ज भरून घेण्यापेक्षा नेत्रदानाबद्दल जनजागृतीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अनेकदा वृद्ध व्यक्ती घरातल्यांसमोर नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित करतात. मात्र व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक नेत्रदानास तयार होत नाहीत, ते त्या मन:स्थितीतही नसतात. अशी कुटुंबे आणि नेत्रपेढय़ा यांच्यात समन्वयकाची भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्ती तयार होणे गरजेचे आहे.’’
‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड इंडिया’चे (नॅब) मानद सचिव के. रामकृष्ण म्हणाले, ‘‘व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरल्यानंतर या अर्जाची नोंद नेत्रपेढी ठेवते. मात्र अर्ज भरल्याचे व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना सांगणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मृत्यूपश्चात त्या व्यक्तीचे नेत्रदान करणे ही कुटुंबीयांचीच जबाबदारी आहे.’’
‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’च्या नेत्रपेढीचे देखभाल प्रमुख विजय निकम यांनी सांगितले, ‘‘व्यक्ती तरूणपणीच नेत्रदानाचे फॉर्म भरतात. प्रत्यक्षात त्या व्यक्तीचा मृत्यू अनेक वर्षांनी होऊ शकतो. इतकी वर्षे अर्जाचा पाठपुरावा करण्याचे काम नेत्रपेढय़ा करू शकत नाहीत. नेत्रदानासाठी फॉर्म भरला नाही तरी चालतो. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी नेत्रपेढीकडे संपर्क साधला असता नेत्रदानाची सुविधा त्वरित उपलब्ध करून दिली जाते. यासाठी व्यक्तीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.’’
नेत्रदानासाठी आता ९९२१३६०८६९ क्रमांक
ससूनमधील ‘दिवाण बहादूर एस. के. नायमपल्ली नेत्रपेढी’तर्फे नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित करणाऱ्यांना आवश्यक माहिती भरण्याची सोय असणारे एक कार्ड दिले जाते व ते सतत जवळ बाळगण्यास सांगितले जाते. या कार्डावर पुण्यातील पंधरा नेत्रपेढय़ांचे संपर्क क्रमांक आहेत. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदानासाठी येणारे दूरध्वनी हमखास उचलले जावेत यासाठी ९९२१३६०८६९ हा स्वतंत्र भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेले सहा महिने या क्रमांकाचे कामकाज सुरू आहे.
नेत्रदानाचे अर्ज भरून घ्यायचे सोपस्कार कशासाठी?
नेत्रदानासाठीचे अर्ज भरून घ्यायच्या मोहिमा होतात, हजारो अर्ज भरले जातात, मात्र अर्ज भरलेल्या व्यक्तींचे त्यांच्या मृत्यूपश्चात खरोखरीच नेत्रदान केले जाते का, हे जाणून घेण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. यामुळे अनेक सोपस्कारांनी भरून घेतलेले हे अर्ज केवळ रद्दी कागदच ठरतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
First published on: 05-03-2013 at 01:50 IST
TOPICSजनजागृती
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Needs new apporch and public awareness for eye donation