नाटकांना चांगले दिवस आले आहेत. मात्र, नाटय़गृहांची अवस्था अतिशय वाईट आहे, अशी प्रतिक्रिया नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी पिंपरीत बोलताना व्यक्त केली. भव्य नाटय़गृहांपेक्षा छोटी-छोटी नाटय़गृहे असावीत त्याचप्रमाणे एकावर एक अशी दुमजली नाटय़गृह उभारणे शक्य असून प्रेक्षकांच्या दृष्टीने सोयीची आहेत, असे मतही त्यांनी मांडले.
पिंपरीत नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक झाली, त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मोहन जोशी यांनी राज्यभरातील नाटय़गृहांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मुंबईतील नाटय़गृहांच्या समस्येबाबत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना भेटलो, त्यांनी तातडीने लक्ष घातले. नाटय़परिषदेकडून शक्य ते प्रयत्न सुरू आहेत. त्या-त्या भागातील पालकमंत्र्यांना भेटून या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती करतो आहोत. नाटय़गृहांची उभारणी करताना जाणकारांना बोलावल्यास, योग्य त्या सूचना करता येतात. बांधकाम सुरू असताना आम्हा कलावंताच्या गरजा लक्षात घेतल्यास पुढे अडचणी येत नाहीत. बीडचे नाटय़गृह चांगले होते, असा अनुभव सांगतानाच शहरी भागातील नाटय़गृहांच्या दुरवस्थेकडे पालिकांचे दुर्लक्ष होत आहे, असे ते म्हणाले. २०० प्रयोग झाल्यानंतरही ‘शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला’ नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न नाशिकला झाला, ती प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी होती. प्रेक्षकांच्या विरोधामुळे आंदोलकांचा बेत फसला व प्रयोग सुरू करावा लागला. ‘गाढवाचं लग्न’ नाटकाच्या वेळी आपल्यालाही अशा आंदोलनाचा अनुभव आला होता. सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिल्यानंतर कोणाचे आक्षेप असण्याचे काही कारण नाही, असे मत  जोशी यांनी मांडले.
...‘बकरे’ मिळतात म्हणून
चांगले ‘बकरे’ मिळतात म्हणून नाटकांवरून चित्रपट बनवले जात असावेत, अशी सूचक टपिंणी निर्मात्या लता नार्वेकर यांनी केली. मराठीत कथा चांगल्या आहेत, लेखकही चांगले आहेत. मात्र, ‘पॅकेज डील’ होते म्हणून व चांगले ‘बकरे’ मिळतात म्हणून नाटकांवर चित्रपट येत असावेत, असे त्या म्हणाल्या. त्यांचा रोख कोणाकडे होता, हे उपस्थितांच्या लक्षात आले.

Story img Loader