पुणे : देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. या सणाच्या निमित्ताने शिवसेनेच्या नेत्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील निवासस्थानी बंधू उद्योजक मंदार पाठक यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी अपर्णा पाठकदेखील उपस्थित होत्या. राज्यातील जनतेला रक्षाबंधन सणाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देखील नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान योजनेचा शुभारंभ पुण्यात झाला आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांना झाला पाहिजे, ही राज्य सरकाराची भूमिका आहे. या माध्यमातून महिलांमध्ये सकारात्मक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. या दृष्टीने सरकारचे पाऊल आहे. पण दुसर्या बाजूला काही जण म्हणत आहेत की, सरकारचे काय होईल. पण ज्यांनी सरकारच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी १२ हजार, १३ हजार, १४ हजार कोटींचे सरकारचे नुकसान केले आहे, आम्हाला आज ते लोक विचारात आहे की, पैशांचा अपव्यय करत आहात. पण त्यांचे अनेक लोक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आले आहेत, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका त्यांनी केली.
हेही वाचा – सासरच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; सासू, सासऱ्यांसह सहाजणांविरुद्ध गुन्हा
जनतेची दिशाभूल करून महिलांचा सरकारवरील विश्वास उडाला पाहिजे, हे एक षडयंत्र असल्याचे सांगत पुन्हा एकदा नीलम गोऱ्हे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली.