पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळजवळ नीरा नदीत मोटार पडून झालेल्या अपघातासंबंधात शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे प्रकल्पाचे संचालक राजेशकुमार कौंडल यांची भेट घेतली आणि या प्रकरणी रिलायन्स इन्फ्रा व त्यांनी नेमलेल्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी त्यांच्यासोबत मावळचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग बारणे, कामगार सनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक, माजी उपसभापती अमोल पांगारे, कोथरूड विभाग प्रमुख संजय निम्हण आदी उपस्थित होते.
पुण्यातील चार तरुणांची मोटार गेल्या आठवडय़ात शिरवळजवळ नीरा नदीत पडली व त्यात चौघांचाही मृत्यू झाला. याला तेथील रस्त्याची रचना तसेच, संरक्षक कठडे-भिंत नसणे हे जबाबदार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला. याबाबत गोऱ्हे यांनी कौंडल यांची भेट घेतली. या वेळी कौंडल म्हणाले, की या दुर्घटनेची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल शासनाकडे देण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत सर्व रस्त्यांची दुरस्ती, स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, क्रेन या संदर्भात आढावा घेऊन सकारात्मक पाऊले उचलली जातील. आ. गोऱ्हे यांनी या घटनांबाबत येत्या नागपूर अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. तसेच, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Story img Loader