पुणे : महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या लतिका दिवाकर गोऱ्हे (वय ८७) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे या त्यांच्या कन्या होत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर यांनी लतिका गोऱ्हे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
हेही वाचा >>> चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस
पंढरपूर येथे जन्म झालेल्या लतिका यांचा विवाह प्रसिद्ध संशोधक व पशूवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिवाकर गोऱ्हे यांच्याशी झाला. विवाहानंतर लतिका यांनी पदवी संपादन केली. अमेरिका, श्रीलंका, फ्रान्स, भारत अशा विविध देशांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. अखिल भारतीय महिला परिषदेच्या जळगाव आणि भारतामध्ये विविध ठिकाणी झालेल्या परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. स्त्री आधार केंद्राच्या वर्धापनदिनानिमित्त ३ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी भाषण केले होते.