मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. स्थानिक पातळीवरदेखील शिवसेनेला गळती लागली आहे. असे असताना शिंदे समर्थक आमदारांवर तसेच बंडखोर आमदारांच्या समर्थकांवर शिवसेनेकडून कारवाई केली जात आहे. असे असताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना हा पक्ष छोट्या छोट्या लोकांमुळे निर्माण झालेल्या प्रसंगामुळे थांबणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. त्या पुण्यातील स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी आज शिवाजीनगर भागात आयोजित केलेल्या साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजू पवार, संजय गवळी, करुम घाडगे आदी स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते.
“शिवसेनेने उभे केलेले काम हे छोट्या छोट्या लोकांनी मध्येच काही प्रसंग निर्माण केल्याने थांबणार नाही.सामान्य जनतेच्या मनाचा आणि लोकभावनेचा विचार राजकारणात होणे अधिक महत्त्वाचे आहे. हाच विचार शिवसेनेत नेहमी होतो,” असे प्रतिपादन नीलम गोऱ्हे यांनी केले.
हेही वाचा >> Ukraine War: सनफ्लॉवर ऑइलच्या बदल्यात बीअर; तेलटंचाईवर मात करण्यासाठी जर्मनीमधल्या पब्जची शक्कल
“शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात अनेक चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे. शिवसेनेच्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब कुटुंबातील पालकांना वेगळ्या अर्थाने मदत होत आहे, असेदेखील नीलम गोऱ्हे म्हणाल्या.