शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शिवसेनेच्या आमदार व पक्ष प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर नाही, असे सांगत आपली जबाबदारी झटकली.
गोऱ्हे यांनी महिला दिनानिमित्त शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी, सतत तुमच्यासोबत असणारे कार्यकर्ते अचानक पक्ष सोडून बाहेर पडले याकडे लक्ष वेधले असता गोऱ्हे यांनी आपल्याकडे शिरूरची जबाबदारी नसल्याचे सांगत उत्तर देण्याचे टाळले. विधान परिषद निवडणुकीमध्ये गरज नसताना शिवसेनेने दोन उमेदवार उभे केले असा भाजपचा आक्षेप आहे, याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, हा विषय माझ्या उमेदवारीशी संबंधित असल्यामुळे पक्ष प्रवक्ता म्हणून मी भाष्य करू शकत नाही. या निवडणुकीमध्ये भाजपने आपल्या दोन उमेदवारांच्या विजयासाठी मनसेची मदत मागितली आहे, याबाबत त्या म्हणाल्या की, विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही आणि महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील.
विशाखा कायद्यानुसार जिल्हास्तरीय समित्यांची
स्थापना झालेली नाही – डॉ. नीलम गोऱ्हे
कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा जाच रोखण्यासाठी विशाखा कायद्यानुसार जिल्हाधिकारी स्तरावर समित्यांची अजूनही स्थापना झालेली नाही, अशी माहिती शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत महिलांवरील अन्याय-अत्याचारांची संख्या वाढत आहे, याकडे लक्ष वेधले. शहरात सोनसाखळी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरटे पसार होतात. विनयभंग-छेडछाड प्रकरणामध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे. महिला दक्षता समित्या कार्यरत असल्या, तरी पोलीस चौकीच्या स्तरावर सामाजिक समिती स्थापन करण्याची आवश्यकता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader