Swargate Rape case : स्वारगेटवरून परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव शोधले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, शिवसेना (शिंदे) नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही वेळापूर्वी स्वारगेट बस आगाराला भेट दिली आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, स्वारगेट एसटी स्टँडवर एका तरुणीवर सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर मी आज स्वारगेट बस आगाराला भेट दिली. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी, पुणे शहराच्या उपयुक्तांना भेटले. त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. आगार निरीक्षक, आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी तपशीलवार चर्चा केली. परिवहन सचिवांकडून या घटनेबाबत माहिती घेतली. मला वाटतंय की आपले पोलीस लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचतील. कारण पोलिसांकडे या प्रकरणाचे धागेद्वारे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या प्रकरणानंतर अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यानुसार मी रेल्वे पोलीस, परिवहन पोलीस व पुणे शहर पोलिसांना काही सूचना केल्या आहेत. या घटनेशी संबंधित आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज देखील मिळालं आहे. आरोपीने संबंधित मुलीशी ओळख काढली व तिच्या ओळखीचा गैरफायदा घेत बंद बसमध्ये जायला सांगितलं. त्यानंतर तो बसमध्ये चढला आणि त्या तरुणीवर अतिप्रसंग केला. या प्रकरणी मी स्वतः पोलिसांना व प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.

नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या?

शिवसेना (शिंदे) नेत्या म्हणाल्या, बस बंद झाल्यावर त्या लॉक कशा करता येतील, त्यात काही अडचणी आहेत का? याविषयी बरीच चर्चा केली. रात्री बस पोहोचल्यावर बसेसची साफसफाई झाल्यानंतर त्या सील कराव्या आणि दुसऱ्या दिवशी बस चालक व वाहकाच्या ताब्यात देताना सील उघडून सर्व खातरजमा करूनच त्यांच्या ताब्यात द्यायला हव्यात, अशा सूचना आम्ही केल्या आहेत. यावर बस व्यवस्थापनाने काही तांत्रिक अडचणी उपस्थित केल्या आहेत. दरवाजावर प्रेशर असतं, दार उघडत नाही अशी काही कारणं त्यांनी सांगितली आहेत. त्यावर प्रशासन काम करत आहे.

महिला सुरक्षेसाठी नीलम गोऱ्हे यांच्या महत्त्वाच्या सूचना

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “आम्ही शिवशाही बसेसची पाहणी केली. बसमधील चालकाच्या मागे असलेलं दार बंद केल्यावर बसमध्ये बसलेली एखादी व्यक्ती कितीही ओरडली तरी चालकापर्यंत आवाज पोहोचत नाही असं आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही बस बंद करून पाहिली. बंद बसमधील व्यक्ती कितीही ओरडली तरी बाहेर आवाज येत नाही ही गोष्ट देखील निदर्शनास आली आहे. ही वस्तुस्थिती पाहून काही उपाययोजना करण्यास आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहेत.