नीरा आणि सफरचंद ज्यूससह रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या सर्वच प्रकारच्या थंडपेयांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मंगळवारी दिले. ‘लोकसत्ता’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विभागातर्फे शहरातील विविध ठिकाणांहून नीरा आणि सफरचंद ज्यूसचे नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण करण्यात आले होते. या विश्लेषणात तपासलेल्या सर्वच नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ हा धोकादायक जीवाणू आढळून आला. या पाश्र्वभूमीवर एफडीए थंडपेयांच्या तपासणीसाठी मोहीम सुरू करणार आहे.
‘लोकसत्ता’ने लक्ष्मी रस्ता, पुणे महानगरपालिका परिसर, डेक्कन, सहकारनगर, पुलाची वाडी आणि शिवाजीनगरमधील न्यायालय परिसरातून उन्हाळ्यात सर्वाधिक खपल्या जाणाऱ्या नीरा आणि सफरचंद ज्यूसचे एकूण ८ नमुने गोळा केले होते. या नमुन्यांच्या विश्लेषणात विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाला सर्वच नमुन्यांमध्ये पोटाचे विकार आणि हगवणीसाठी कारणीभूत ठरू शकणाऱ्या ‘ई-कोलाय’ या जीवाणूचे अस्तित्व सापडले.
या पाश्र्वभूमीवर थंडपेयांच्या तपासणीसाठीचे आदेश अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिले आहेत. ते म्हणाले, ‘‘अखाद्य बर्फाबरोबर ई-कोलाय सारखे जीवाणू पोटात जाऊ शकतात. थंडपेयांमध्ये पिण्याच्या पाण्यापासूनच बनवलेला बर्फ वापरणे आवश्यक आहे. नाशवंत माल टिकवण्यासाठी ज्या बर्फात ठेवला जातो तो बर्फ पेयांमध्ये टाकला जाण्याची शक्यता असते. नीरा आणि मिल्कशेक सारख्या पेयांसाठी वापरलेला बर्फ आणि सरबतांमध्ये वापरलेले रंग यांची तपासणी केली जाईल.’’
सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, ‘‘एफडीएकडून पेयांचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासले जातील. पेय आरोग्यास असुरक्षित असल्यास संबंधितावर न्यायालयात खटला भरला जातो. तर पेयाचा दर्जा कमी असल्यास किंवा विक्रेत्याकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्यास दंडात्मक कारवाई होते. उत्पादकाने एफडीएचा परवाना किंवा नोंदणी केली आहे का, पाणी वापरण्याचा स्रोत कोणता, बर्फ ‘फूड ग्रेड’चा आहे का या गोष्टी तपासल्या जातील. पेयांमध्येही १०० पीपीएमपेक्षा (पार्ट्स पर मिलियन) अधिक खाद्यरंग वापरता येत नाही.’’
पालिकेचा आरोग्य विभाग काय करतोय?
अन्न सुरक्षा व मानदे कायदा (२००६) अनुसार अन्नाच्या सुरक्षिततेशी संबंधित कारवायांची जबाबदारी एफडीएची आहे. असे असले तरी रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या थंडपेयांचे स्टॉल बेकायदेशीर असल्यास त्यांच्यावर पालिका कारवाई करू शकते. आरोग्य प्रमुख एस. टी. परदेशी म्हणाले, ‘‘रस्त्यावर व्यवसाय करण्याचा परवाना नसलेल्या स्टॉल्सवर कारवाई करण्याच्या सूचना १५ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देत आहोत. अशा स्टॉल्सवर अतिक्रमणाची कारवाई होऊ शकते.’’
‘ई-कोलाय जीवाणूचे घातक परिणाम’
‘‘नारळाचे पाणी किंवा वरून बर्फ न घातलेला ताजा उसाचा रस स्वच्छ असतो. पण दूषित पाण्यापासून बनवलेला बर्फ घातलेली पेये प्यायल्यास त्याबरोबर ‘ई-कोलाय’ जीवाणू पोटात जाऊ शकतो. हा जीवाणू एक प्रकारच्या विषारी द्रव्याचे उत्सर्जन करतो. ई-कोलायचे विविध प्रकार देखील आहेत. त्यातील कोणता जीवाणू वरून पोटात गेला आणि त्याने सोडलेल्या विषारी द्रव्याचे प्रमाण किती यावर आरोग्यास हानी काय ते ठरते. ई-कोलायच्या प्राथमिक उपद्रवात जुलाब, उलटय़ा, पोटात पेटके (क्रँप) येणे यांचा समावेश असून संसर्ग अधिक असल्यास गंभीर परिणामही दिसू शकतात. त्यामुळे शक्यतो स्वच्छतेची दक्षता घेतलेली पेये पिण्याकडे कल असावा, तसेच घराबाहेर पडताना स्वत:ची पाण्याची बाटली बरोबर बाळगावी.’’
– डॉ. संजय कोलते, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा