पुणे : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट-पीजी (संयुक्त प्रवेश पात्रता परीक्षा पदव्युत्तर पदवी) ही प्रवेश परीक्षा आता ११ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नीट-युजी परीक्षेच्या निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या पूर्वी २३ जून रोजी होणारी ही परीक्षा ‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून रद्द करण्यात आली होती. नीट-पीजीची नवी तारीख जाहीर झालेली असली, तरी आता सावधगिरीचे कोणकोणते उपाय योजून ही परीक्षा होणार याबाबत औत्सुक्य आहे. आधीचा अनुभव लक्षात घेता, विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधूक आहे. त्यामुळे या वेळी तरी योग्य ती उपाययोजना करून परीक्षा सुरळीत पार पाडेल, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या देशभरातील वैद्यकीय शिक्षण संस्थांतील सुमारे ७० हजार जागांसाठी दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना नोंदणी केली आहे.

हेही वाचा…महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्तांच्या नावे बनावट प्रमाणपत्र; शिक्षक भरतीसाठी वापर?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २३ जूनला नीट पीजी या परीक्षेचे नियोजन केले होते. मात्र, परीक्षेच्या आदल्या दिवशी ती रद्द करण्यात आली होती. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यावर देशभरात गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षेच्या केवळ बारा तास आधी कोणतेही नेमके कारण न देता परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले होते. परिणामी, परीक्षा नियोजनातील ढिसाळपणाबाबत देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधी पक्षांनी ‘नीट’मधील गोंधळांवरून केंद्र सरकारला धारेवर धरले होते. यावर संसदेतही चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, एनबीईएमएस, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी), सायबर सेलचे अधिकारी, परीक्षा आयोजनातील तांत्रिक सहकारी टीसीएस यांच्या अनेक बैठका झाल्या. त्यात सुरक्षितपणे परीक्षा घेण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्रालयाने प्रवेश परीक्षा घेण्यासाठीच्या सक्षमतेबाबत सखोल मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा…पुण्यात लाँच झाली सीएनजी बाईक, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन! काय आहे खासियत? किती आहे किंमत?

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय वैद्यकीयशास्त्र परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार आता नीट पीजी ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती https://natboard.edu.in या संकेतस्थळाद्वारे दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet pg exam rescheduled for 11 august 2024 amidst student concerns over previous cancellations pune print news ccp 14 psg