अॅड. पद्मिनी मोहितेंची उचलबांगडी करून पिंपरी महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी ज्योती भारती यांची नियुक्ती झाली. तथापि, १५ दिवसातच त्यांनाही घरी बसवत नीता परदेशी यांची या पदावर वर्णी लावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी भारतींची नियुक्ती केली असताना राष्ट्रीय अध्यक्षा अनिता वर्मा यांनी परदेशींना नियुक्तीचे पत्र दिल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत. शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईरांच्या विरोधकांना पक्षश्रेष्ठींनी ताकद दिली असून कुरघोडीच्या राजकारणामुळे  झालेल्या खांदेपालटाने पक्षातील वातावरणच ढवळून निघाले आहे.
काँग्रेसचे संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अॅड. मोहिते यांची नियुक्ती केली होती. तथापि, मोहितेंच्या कार्यपध्दतीचे भांडवल करून त्यांची उचलबांगडी करण्यात आली व भोईर समर्थक ज्योती भारतींची नियुक्ती झाली. पक्षातील गटबाजी व ‘अर्थ’ कारणातून हे खांदेपालट झाल्याचे बोलले जात होते. पालिका निवडणुकीत तिकीट कापलेल्या व शहराध्यक्षपदी डावलले गेल्याने तीव्र नाराज असलेल्या नीता परदेशींनी पूर्ण ताकद पणाला लावून श्रेष्ठींचा आशीर्वाद मिळवला व दिल्लीतून वर्णी लावून घेतली. या घडामोडीत हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, कृपाशंकर सिंह या नेत्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. भारती यांच्याशी फारसे वितुष्ट नसतानाही भोईर यांना धक्का देण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे बोलले जाते. माणिकराव ठाकरे वगळता बहुतांश काँग्रेसचे नेते भोईर यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराज आहेत. त्यामुळे भोईर विरोधकांना ताकद देण्याची खेळी दिसून येते. सध्याच्या घडामोडी पाहता यापुढील काळात पक्षातील गटबाजी आणखी तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा