पिंपरी- चिंचवड : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. हे रुग्णालय स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या कुटुंबाने मोठ्या मेहनतीने उभारलेल आहे. असा उल्लेख देखील फडणवीस यांनी केला आहे. ते पुण्यातील बालेवाडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, गठीत केलेली समिती सर्व प्रकारच्या गोष्टीवर लक्ष देत आहे. जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा होईल आणि भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत म्हणून आमचं लक्ष देखील असेल. पुढे ते म्हणाले, अधिवेशनामध्ये कायद्यात बदल करून धर्मदाय आयुक्तांना काही अधिकार देणार आहोत. धर्मदाय व्यवस्था ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून रुग्णालयातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल. यासाठी मुख्यमंत्री आरोग्य कक्ष देखील याला जोडला जाईल, जेणेकरून त्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दबाव राहील.
पुढे ते म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे स्वर्गीय लता मंगेशकर कुटुंबीयांनी मोठ्या मेहनतीने उभारलेल आहे. ते रुग्णालय नावाजलेल आहे. रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळं काही रुग्णालयाचे चुकीच आहे. असं म्हणण्याचं कारण नाही. कालचा जो प्रकार आहे. तो असंवेदनशील आहेच. जे चुकीचं आहे, तिथं चुकीचं म्हणाव लागेल. परंतु, ती चुक सुधरावी लागेल, ती चुक रुग्णालयाने सुधारल्यास मला आनंदच आहे.
पुढे ते म्हणाले, घडलेल्या प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये या प्रकरणाची दखल घेतलेली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे विनाकारण शोबाजी करू नये. तसेच कुठल्या रुग्णालयाची तोडफोड करणं देखील चुकीच असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.