आपला शेजारी हाच खरा घराचा खरा पहारेकरी असतो याची प्रचिती चिंचवडमधील चिंचवडेनगर येथे मंगळवारी सकाळी आली. संपूर्ण कुटुंबासह फिरण्यासाठी बाहेर गेलेल्या व्यक्तीचे घर उघडे दिसल्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलेने घरात डोकावून पाहिल्यानंतर त्यांना घरात चोर शिरल्याचे समजले. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखून घराला बाहेरून कडी लावून घेतली. नागरिकांना बोलावून घरात चोरटा शिरल्याचे सांगितले. नागरिकांनी पोलिसांना फोन करून बोलविल्यानंतर चोरटय़ाला बेडय़ा ठोकण्यात आल्या. फक्त शेजारी राहणाऱ्या महिलेमुळेच हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडेनगर येथे अतुल झुनकर हे राहण्यास आहेत. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी ते संपूर्ण कुटुंबासह बाहेर फिरण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला होती. मंगळवारी या महिलेला सकाळी अकराच्या सुमारास अतुल झुनकर यांचे घर उघडे दिसले. त्यामुळे त्यांनी घरात डोकावून पाहिले असात एक व्यक्ती घरात काही वस्तू शोधत असल्याचे आढळले. त्यांना घरात चोर शिरल्याचे तत्काळ लक्षात आले. चोरटय़ाने देखील त्यांना पाहिले पण त्यांनी तत्काळ घराचा दरवाजा बाहेरून लावून घेतला.
नागरिकांना आवाज देऊन घरात चोरटा शिरल्याचे सांगत बोलावून घेतले. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चिंचवड पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी घराचा दरवाजा उघडून चोरटा सर्फराज बाबामिया शेख (वय ३०, रा. कसबा पेठ, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पंचवीस हजार रोख आणि सोन्याचे दागिने असा पन्नास हजार रुपयांचा ऐवज देखील मिळाला. शेख हा सराईत गुन्हेगार असून तो दिवसा घरफोडय़ा करण्यात पटाईत आहे. त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर एका सराफाचे दुकान फोडल्याचादेखील गुन्हा दाखल आहे. अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. पण, तो पोलिसांना सापडत नव्हता. मात्र, एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे त्याला बेडय़ा ठोकण्यात यश आले. त्याबरोबरच शेजारी हा आपल्या घराचा खरा पहारेकरी असल्याचे देखील स्पष्ट झाले. या प्रकरणी अतुल यांचे भाऊ सुहास नामदेव झुनकर (वय ४६, रा. पावर हाऊस शेजारी, चिंचवडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा