अपंग मुलाला वाढवण्याची अतीव यातायात करणाऱ्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलावरील उपचार सोयीचे व्हावेत, जिन्यावरून त्याची ने-आण सुकर व्हावी यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना सोसायटीतील इतर रहिवाशांकडून विरोध होत असल्यामुळे नियमावरील बोट महत्त्वाचे का माणुसकी महत्त्वाची, असा प्रश्न या आई-वडिलांना पडला आहे. विशेष म्हणजे, अपंगांच्या सोयीसाठी कायदे व नियम करण्यात आले असले, तरी त्यामुळेही हा प्रश्न सुटत नाही ही वस्तुस्थिती आहे.
सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे असलेल्या ‘अमरेंद्र श्री सहकारी गृहरचना संस्था’ या इमारतीत देवेंद्र जैन यांनी सदनिका खरेदी केली असून जैन कुटुंबावर मुलासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. जैन यांची सदनिका या सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर आहे. त्यांचा मुलगा अपंग आणि विशेष मुलांच्या श्रेणीतील असून तो आता एकवीस वर्षांचा आहे. जैन यांना त्यांच्या मुलासाठी या सदनिकेच्या रचनेत काही बदल करून घेणे आवश्यक आहे. या अपंग मुलाला सर्व गोष्टींसाठी पालकांवरच अवलंबून राहावे लागते. त्याला जिथे कुठे जायचे असेल, तेथे त्याला दुसऱ्या कोणीतरी उचलून न्यावे लागते. रोज उन्हात नेऊन त्याच्यावर उपचारही करावे लागतात.
उपचार आणि मुलाची ने-आण सोयीची व्हावी यासाठी जैन यांना त्यांनी सदनिका घेतलेल्या इमारतीच्या मागील जागेत एक लोखंडी जिना व छोटी गॅलरी बांधायची आहे. त्यासाठीचा खर्चही तेच करणार आहेत. मात्र, या बांधकामाला सोसायटीतील रहिवाशांनी आक्षेप घेतला असून कायदे आणि नियमांवर बोट ठेवत जैन यांचे काम अडवण्यात आले आहे.
इमारतीत जे बांधकाम नव्याने करून घ्यायचे आहे त्यासाठी जैन यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाची रीतसर परवानगी घेतली आहे. या बांधकामाचे नकाशेही महापालिकेने मंजूर केले आहेत. या सोसायटीच्या जागेचे कुलमुखत्यार पत्र ज्यांच्याकडे आहे, त्यांनीही जैन यांना या बांधकामासाठीचे ‘ना हरकत पत्र’ दिले आहे. नियमांचे हे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरही सोसायटीतील इतर सभासदांनी मात्र या बांधकामाला विरोध करून काम थांबवल्याची जैन यांची तक्रार आहे. त्यामुळे बांधकामाची परवानगी हातात असतानाही आवश्यक ते बदल करून घेणे जैन यांना  शक्य झालेले नाही. सार्वजनिक ठिकाणी अपंगांची अडचण होऊ नये यासाठी योग्य ती सोय उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यानुसार अपंग कल्याण आयुक्तांकडेही जैन यांनी दाद मागितली आहे. मात्र, ठिकठिकाणी अर्ज व निवेदने दिल्यानंतरही त्यांना न्याय मिळालेला नाही.
सोसायटीच्या अध्यक्षांकडे याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, सोसायटीच्या खरेदीखताचा काही भाग पूर्ण झाला असून सोसायटीच्या सार्वजनिक जागेत कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी इतर सभासदांची परवानगी घेणे आवश्यक आहे. सोसायटीत साठ सभासद असून जैन यांनी त्यांची परवानगी घेतलेली नाही. जैन यांची सदनिका पहिल्या मजल्यावर असून त्यांनी सुरू केलेल्या नवीन बांधकामामुळे खालच्या मजल्यावरील घरात अंधार येऊ लागला आहे. तसेच पाणी झिरपू लागले आहे.