एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील पोलीस दाम्पत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड यांच्यावर नेपाळ सरकारने नेपाळमध्ये प्रवेश करण्यास १० वर्षांची बंदी घातली आहे. या निर्णयाची प्रत नेपाळ पोलिसांनी पुणे पोलिसांना पाठवल्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
नेपाळ सरकारच्या निर्णयाने राठोड दाम्पत्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले नव्हते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोघांनी फक्त पोलीस दलाचीच नव्हे तर संपूर्ण देशाची प्रतिमा मलीन केली असून हा धक्कादायक प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शुक्ला यांनी दिली.
दिनेश आणि तारकेश्वरी राठोड हे दोघेही पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. दोन महिन्यांपूर्वी ५ जून रोजी त्यांनी काठमांडूमध्ये पत्रकार परिषद घेऊन एव्हरेस्ट शिखर सर करणारे आपण भारताचे पहिलेच दाम्पत्य असल्याचे सांगितले होते.
पुणे पोलिसांनी राठोड दाम्पत्यांविरोधात चौकशी सुरू केल्यापासून दोघेही फरार आहेत. दोघांविरोधात सक्त कारवाई करणार असल्याची माहिती शुक्ला यांनी या वेळी दिली. परंतु, दोघांना अटक न होता त्यांची पदावनती किंवा पगारवाढ रोखली जाऊ शकते, असे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट मोहिमेसाठी सुटी मिळावी, असा अर्ज पोलीस आयुक्तांकडे केला होता. एक एप्रिलपासून तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे सुटीवर गेले होते. त्यानंतर सात जून रोजी राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याची बातमी प्रसृत झाली. राठोड दाम्पत्याने २३ मे रोजी एव्हरेस्ट सर केल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. एव्हरेस्टवर राष्ट्रध्वज फडकाविणारे छायाचित्र त्यांनी प्रसारमाध्यमांना दिले होते. त्या वेळी पुण्यातील गिर्यारोहक एव्हरेस्ट मोहिमेवर होते. राठोड दाम्पत्य एव्हरेस्टवर चढाई करताना त्यांच्या पाहण्यात आले नव्हते. त्यामुळे राठोड दाम्पत्याची कथित एव्हरेस्ट मोहीम संशयास्पद असल्याचे मत गिर्यारोहकांनी व्यक्त केले होते.
पिंपरी-चिंचवड येथील गिर्यारोहकांच्या संघटनेने याप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या मोहिमेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा