‘शहरभर लाइट नाही, रस्त्यावरच लोक राहताहेत. तीन दिवसांनी आज पाणी प्यायला मिळालं, खायला बिस्किटं मिळाली. विमानतळावर थांबून आहे. रांगेत उभे राहतो. दोनदा आमचा नंबर आला, पण ‘उद्या बघू’ म्हणत जाऊ दिलं नाही. पुन्हा उद्या रांगेत थांबायचं, कधी घेऊन जातात माहीत नाही. वाट बघून आता कंटाळा आलाय..’
सुरेश पाटील सांगत होते. सांगली आणि पुण्याचे मिळून ११ जणांचा गट गेल्या शुक्रवारी नेपाळला गेला. त्यात चार मुले आणि पाच महिलांचा समावेश आहे. त्यांनी शनिवारी सकाळी काठमांडू येथील पशुपतिनाथाचे दर्शन घेतले. तेथे असताना भूकंपाचा हादरा झाला. त्यानंतर बाहेर पडल्यावर दुसरा धक्का जाणवला. तेव्हा त्याची तीव्रता मोठी असल्याचे जाणवले. त्यामुळे हे सर्व जण मोकळ्या मैदानात थांबून राहिले, मग विमानतळावर पोहोचले. तोपर्यंत खूप अफवा पसरल्या होत्या, मोबाइल क्रमांक लागेनासे झाले होते. विमानतळावर इतकी गर्दी आहे की यायला मिळत नाही. याबाबत या गटातील सुरेश पाटील यांनी सांगितले, ‘इथली यंत्रणा काहीही दाद लागू देत नाही. विमान मिळत नाही. रांगेत थांबायला सांगतात. आमचा दोनदा नंबर लागला तरी ‘उद्या बघू’ म्हणून सोडलेच नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगेत थांबावे लागत आहे. खाण्याची आणि पाण्याची सोय नव्हती. प्यायला पुरेसे पाणी नाही, पाण्याची बाटली मिळाली तरी दीडशे-दोनशे रुपयांना घ्यावी लागते. त्यामुळे वाट बघून आता कंटाळा आलाय. कधी सुटका होणार माहीत नाही.’
याबाबत पुण्यातील नातेवाइकसुद्धा आता अधीर झाले आहेत. पुण्यातील उद्योजक राजेश पवार यांच्या आई या गटासोबत आहेत. पवार यांनी सांगितले, की सर्वच प्रकारची हानी झालेली असल्याने आता तेथून सर्वच लोक बाहेर पडत आहेत. त्यात तेथील भारतीय व्यापारी, व्यावसायिक यांचाही समावेश आहे. सर्वच ढासळले असल्याने तेथे राहून काय उपयोग, म्हणून ही मंडळी बाहेर पडत आहेत. त्यामुळे पर्यटकांना यायला संधी मिळत नाही. विमानांमध्ये जागा मिळत नाही. व्यापारी, व्यावसायिक काही ना काही संपर्क काढून बाहेर पडत आहेत. यंत्रणा पर्यटकांना मात्र दाद लागू देत नाहीत.
‘निम्म्याहून जास्त मराठी पर्यटक तिथेच’
महाराष्ट्रातील एकूण १८७ पर्यटक नेपाळमध्ये अडकून पडले होते. त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त मंडळी तिथेच आहेत. त्यांना माघारी येण्यासाठी यंत्रणांकडून सहकार्य मिळत नाही. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न केले जायला हवेत, अशी अपेक्षा राजेश पवार यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सदनाशी संपर्क साधूनही काही उपयोग होत नाही. मराठी पर्यटक दिल्लीत आल्यानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठविण्याकरिता मदत करण्याच्या सूचना आहेत. मात्र, नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक दिल्लीपर्यंत पोहोचणार कसे, हा मोठा प्रश्न आहे, असेही पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा