नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर तिथे गेलेले आपले कुटुंबीय सुखरूप आहेत याचा दिलासा पुण्यातील त्यांच्या नातेवाइकांना आहे. तरीही उशिराने होणारा संपर्क आणि नेपाळमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे रविवारी विलंबाने सुरू असलेली विमान सेवा यामुळे या नातेवाइकांना आप्तांची चिंताही सतावते आहे. ट्रेकिंग, सहल, व्यावसायिक परिषद अशा विविध कारणांसाठी नेपाळला गेलेल्या पुणेकरांच्या नातेवाइकांशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला.   
ट्रेकर असलेली चिंचवडची तेरा वर्षांची शरयू मिरजकर ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या मोहिमेबरोबर नेपाळला गेली असून तिच्याबरोबर आणखीही लहान मुले या मोहिमेत सहभागी झाली आहेत. या ट्रेकर्सचे विमान नेपाळला उतरले आणि पुढच्या अध्र्या तासातच नेपाळला भूकंपाचा धक्का बसला. ही टीम सुखरूप असल्याचे शरयूच्या आई वनश्री मिरजकर यांनी सांगितले. मिरजकर म्हणाल्या, ‘शनिवारी रात्री साडेआठ वाजता आमचा शरयूशी संपर्क झाला. मुलांबरोबर ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे, आशिष माने हे उपस्थित असून ते मुलांची काळजी घेत असल्यामुळे हायसे वाटले. पण रविवारी सकाळपासून ही सर्व मंडळी विमानतळावरच अडकून पडली होती. प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे विमान कधी मिळेल हे सांगता येत नव्हते. रविवारी संध्याकाळी आमच्या मुलांना विमानात जागा उपलब्ध होणार इतक्यात जोराचा पाऊस सुरू झाला आणि विमान सेवा बंद झाल्यामुळे आम्हाला पुन्हा काळजी वाटू लागली. शरयू आधी अन्नपूर्णा बेस कॅम्पला जाऊन आली आहे, पण तिच्या बरोबरची दहा मुले अगदी नवीन आहेत. त्यामुळे या मुलांच्या पालकांना धीर देण्यासाठी मी खंबीर राहणार आहे.’
पिंपरीच्या सोनाली आल्हाट यांचे कुटुंबीय नेपाळला सहलीला गेले आहेत. त्या म्हणाल्या, ‘माझ्या सासूबाई, सासरे, चुलत सासूबाई असे कुटुंबातील ८ ते ९ जण नेपाळला फिरायला गेले आहेत. भूकंप झाल्यावर कुणाशीच संपर्क होत नसल्याने खूप घाबरलो होतो. पण शनिवारी रात्री ७ वाजता त्यांचा दूरध्वनी आला आणि सर्व जण सुरक्षित असल्याचे कळले. तरी त्यांच्यापैकी एका व्यक्तीला थोडा मार लागल्याचे समजले आहे. रविवार दुपारनंतर काहीही संपर्क होऊ शकलेला नाही. सर्व जण सध्या कुठे आहेत, परत कधी येणार हे कळू शकलेले नाही त्यामुळे सर्व जण परतेपर्यंत रुखरुख लागून राहणार.’
राम फुगे म्हणाले, ‘माझ्या बहिणीचे पती नेपाळला ट्रेकिंगसाठी गेले असून ते व त्यांच्याबरोबरचे २४ ट्रेकर्स नेमचीबाजार येथे लष्कराच्या एका बचाव शिबिरात आहेत. पण त्यांना परत येण्यासाठी काय सुविधा उपलब्ध होऊ शकेल याविषयी स्पष्टता नाही. आम्ही आमच्या परीने परतीच्या नियोजनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत.’
पुण्याचे काही डॉक्टर नेपाळला एका परिषदेसाठी गेले आहेत. हडपसरचे डॉ. दुर्वास कुरकुटे यांच्या पत्नी पल्लवी म्हणाल्या, ‘भूकंप झाल्यानंतर लगेच त्यांनी दूरध्वनी करून सुखरूप असल्याचे कळवले होते. पण रविवारी विमाने विलंबाने सुटत असल्यामुळे ते दिवसभर विमानतळावरच अडकले होते त्यामुळे काळजी वाटते आहे.’
गिर्यारोहक सुखरूप
एव्हरेस्ट सर करणाऱ्या दुसऱ्या मोहिमेतील सदस्य डॉ. अनूप कुलकर्णी हे सुखरूप असून ते चीनमधील दाबेयुजवळील ५१०० मीटर उंचीवर असलेल्या बेस कॅम्पजवळ पोहोचले आहेत. मात्र, नेपाळमध्ये रविवारीही झालेल्या भूकंपामुळे बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे गिर्यारोहकांनी बेस कॅम्पवरच थांबावे, असे चायनीस माउंटेनिअिरग असोसिएशनने त्यांना सांगितले आहे. वातावरणात सुधारणा झाल्यावर ही मोहीम पुढील टप्प्याकडे कूच करणार आहे, डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
अॅटलास कॉप्कोमध्ये वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. अनूप कुलकर्णी हे एव्हरेस्टच्या उत्तर बाजूकडून चढाई करणाऱ्या नागरी मोहिमेमध्ये वैद्यकीय सल्लागार म्हणून सहभागी झाले आहेत. ४० वर्षीय अनूप यांनी यापूर्वी सह्य़ाद्री पर्वतरांगांमधील अनेक अवघड मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करून हिमालयात चार मोहिमा केल्या आहेत. हैदराबाद येथील ट्रान्सेड अॅडव्हेंचर्स या संस्थेने चीनमार्गे आयोजन केलेल्या या मोहिमेमध्ये ट्रेन्झिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारविजेते शेखर बाबू बचिनेपल्ली आणि १७ वेळा एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणारे मुख्य शेर्पा नीमा गुरु सहभागी झाले आहे. तर, पिंपरी-चिंचवड येथील माउंटेनिअिरग असोसिएशनतर्फे आयोजित मोहिमेध्ये सहभागी झालेले किशोर धनकुडे, सुरेश कुवळेकर आणि सचिन शिंदे हे सुखरूप आहेत.

Story img Loader