तरुण वयात स्वत:च्या किंवा वडिलोपार्जित व्यवसायात उतरणाऱ्या पुणेकर उद्योजकांना ‘देणाऱ्याचे हात’ घेण्याचे धडे मिळणार आहेत. विशेष बाब ही की हे धडे त्यांना दुसरे-तिसरे कुणी नव्हे तर नेदरलँडचा प्रसिद्ध फुटबॉलपटू रॉन व्लार देणार आहे.
रॉनचे भारताशी असलेले नातेही या देणाऱ्या हातांनीच जोडले गेले आहे. वयाच्या विसाव्या वर्षी खेळलेल्या पहिल्या फुटबॉल सामन्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा नियमितपणे परभणीतील ‘सोशिओ इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या संस्थेला देणारा रॉन सध्या ही संस्था पाहण्यासाठी परभणीत आला आहे. त्याच्या भारतभेटीचा एक भाग म्हणून तो गुरुवारी पुण्यातल्या ७० ते ८० तरुण उद्योजकांशी संवाद साधणार आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी आणि माणिक कुलकर्णी यांनी १९८० मध्ये परभणीत ‘सोशिओ इकोनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट’ (एसइडीटी) ही संस्था स्थापन केली. निराधार मुलांना घर मिळवून देण्यासाठी या संस्थेने केरवाडी येथे ‘स्वप्नभूमी’ हा प्रकल्प सुरू केला असून परभणीतील २५० गावांमध्ये बालकांचे शिक्षण, स्त्री सबलीकरण, आरोग्य, ग्रामीण भागातील उद्योजकता विकास अशा विविध क्षेत्रांत ही संस्था कार्यरत आहे.
‘परांजपे स्कीम्स’ या बांधकाम कंपनीचे कार्यकारी संचालक अमित परांजपे आणि त्यांचे कुटुंबीय रॉनच्या परभणी भेटीत सातत्याने त्याच्या संपर्कात आहेत. अमित परांजपे म्हणाले, ‘मी गेल्या ७-८ वर्षांपासून एसइडीटी संस्थेच्या कामांमध्ये सहभागी आहे. रॉन व्लार वीस वर्षांचा असताना त्याने आपला पहिला सामना खेळला आणि नेदरलँडमध्ये असलेल्या ‘योजना’ या संस्थेद्वारे त्याने परभणीतल्या एसइडीटीला पहिल्यांदा आर्थिक मदत दिली. त्यानंतर तो नियमितपणे मदत करत राहिला. आताही तो आणि त्याचे वडील भारतात केवळ एसइडीटीचे काम पाहण्यासाठी आले आहे. सध्या दोन दिवस तो परभणीतच राहिला असून संस्थेच्या प्रत्येक गोष्टीत तो खूप उत्सुकतेने रस घेतो आहे.’

‘पुण्यातल्या २० ते ३५ या वयोगटातील तरुण उद्योजकांशी रॉन गुरुवारी बोलणार आहे. बांधकाम, उत्पादन अशा विविध क्षेत्रांमधील उद्योजकांचा यात समावेश आहे. व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच समाजाचे देणे परत देण्याची सवय लावून घेणे ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि त्या कामाचा अहवाल देणाऱ्या एसइडीटीसारख्या संस्थादेखील कमी असून या संस्थेची ओळखही या कार्यक्रमात करून दिली जाईल.’
– अमित परांजपे,  कार्यकारी संचालक, परांजपे स्कीम्स

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा