लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) १ डिसेंबर होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४साठी उमेदवाचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीतील खात्यात उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ यापूर्वी २५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार होती. त्या परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्रे वितरित करण्यात आलेली होती. मात्र, १ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेला उमेदवारांना जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीएससीने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी किंवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात एमपीएससीची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा-‘पर्वती’त कौल कुणाला? मिसाळ यांची विजयाची मालिका सुरु राहणार की…

परीक्षा कक्षात प्रवेश मिळण्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षेवेळी उमेदवारांनी एमपीएससीच्या मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे. एमपीएससीकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची, प्रचलित नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New admission certificate required for mpsc joint preliminary examination to be held on december 1 pune print news ccp 14 mrj