वीजबिल थकविणाऱ्या ग्राहकांबाबत कठोर पावले उचलत वसुलीचा मंत्र जपतानाच ‘महावितरण’ ने आता वीज ग्राहक वाढविण्यावर भर देण्याचे नवे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. राज्यात पुढील तीन वर्षांमध्ये ३० ते ३२ लाख नव्या वीजजोडण्या देण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून, त्यादृष्टीने पायाभूत आराखडय़ाच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी करण्यात आली आहे.
सातत्याने वाढते वीजग्राहक व त्याबरोबरीने विजेची वाढत जाणारी मागणी लक्षात घेता वीजकपातीचे चटके ग्राहकांना सोसावे लागतात. जुनाट यंत्रणेमुळे वीज वितरणातील अडथळ्यांचा फटकाही ग्राहकांनाच सोसावा लागतो. मात्र, सध्या विजेची उपलब्धता असल्याचा व यंत्रणेत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. वीजबिलांची पुरेशी वसुली होत नसलेल्या भागातच वीजकपात करण्यात येत असल्याचे ‘महावितरण’ कडून सांगण्यात येत आहे. विजेची उपलब्धता व यंत्रणेतील सुधारणांचा परिणाम म्हणून भविष्यात जास्तीत जास्त ग्राहकांना वीजजोडण्या देऊन त्यांना चांगल्या प्रकारची सेवा देता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पायाभूत आराखडय़ाच्या पहिल्या टप्प्यामध्ये उपकेंद्रांची उभारणी, सध्याच्या उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, नव्या वाहिन्या टाकणे, रोहित्र उभारण्याची कामे हाती घेण्यात आली. सिंगल फेजिंग व स्वतंत्र गावठाण फिडर्सची कामेही त्यात करण्यात आली. मागील तीन ते चार वर्षांमध्ये नव्याने ६०० पेक्षा जास्त उपकेंद्रांची उभारणी झाली. त्यातून चांगल्या दाबाने वीजपुरवठा होण्याबरोबरच, तांत्रिक हानी कमी होण्यास मदत झाली. त्यामुळे नियमितपणे वीजजोडण्या देणेही शक्य झाले. भविष्यामध्ये वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व नूतनीकरणाची कामे सुरूच राहणार आहेत.
सध्या दरवर्षी विविध वर्गवारीतील १० ते ११ लाख ग्राहकांना नव्या वीजजोडण्या देण्यात येतात. याच वेगाने पुढे जाण्याच्या दृष्टीने पायाभूत आराखडय़ाचा दुसरा टप्पा आखण्यात आला आहे. या दुसऱ्या टप्प्याला राज्य शासनाचीही मंजुरी मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ३० ते ३२ लाख ग्राहकांना वीजजोडण्या देण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. या टप्प्यासाठी ६५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, ४१२ नवी वीज उपकेंद्र उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १०५ उपकेंद्रांचा क्षमतेमध्ये वाढ करणे, २६३ उपकेंद्रात जादा रोहित्रांची उभारणी करणे, नव्या वाहिन्या टाकणे व नवी रोहित्रे उभारण्याची कामेही दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा