सासवड येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या मतपत्रिका ठेवण्यासाठी नव्याने मतपेटी विकत घेण्याची वेळ साहित्य महामंडळावर आली. अंतर्गत राजकारणामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मतपेटय़ा गेली सव्वा दोन वर्षे सीलबंद असल्याने या निवडणुकीच्या मतपत्रिका ठेवण्यासाठी आता स्वतंत्र मतपेटीचा वापर होणार आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारिणी १ एप्रिल २०११ रोजी अस्तित्वात आली. मात्र, या निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाले असल्याची तक्रार करीत परिषदेचे माजी कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी अद्यापही सुरू असून अंतिम निकाल लागेपर्यंत धर्मादाय आयुक्तांनी या मतपेटय़ा सीलबंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परिषदेच्या ग्रंथालयामध्ये या सीलबंद मतपेटय़ा ठेवण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय आगामी तीन वर्षांसाठी परिषदेकडे आले आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची जबाबदारी साहित्य महामंडळाकडे आली आहे. आपल्याकडे असलेल्या मतपेटय़ा गुंतल्यामुळे आता या निवडणुकीसाठी साहित्य महामंडळाला नवीन मतपेटी विकत घ्यावी लागली. मतपेटी विकत घेतली आहे, याला निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी दुजोरा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा